रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आज पार पडली. या दरम्यान, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत चलनविषयक पतधोरण जाहीर केले. यावेळी दास यांनी माहिती दिली की, रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेटमध्ये जैसे थे ठेवल्याने व्याजदर वाढणार नाही, ज्यामुळे ईएमआय भरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयकडून व्याजदर आहे तो कायम ठेवण्याची ही चौथी वेळ आहे. त्यामुळे देशातील कर्जधारकांना दिलासा मिळाला आहे.
रेपो दराचा संपूर्ण परिणाम बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाच्या दरांवर पडतो. रेपो रेट वाढला तर बँका घर, कार किंवा वैयक्तिक कर्जावरील व्याजदर वाढवतात, मात्र रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो रेट न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या कर्जाच्या हप्त्यापासून दिलासा मिळू शकतो.