राज्यातील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर आता रविवारी उद्या 15 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये महायुतीच्या सुमारे 35 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विशेष हा शपथविधी सोहळा नागपुरातील राजभवनात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते.त्यानंतर 5 डिसेंबर रोजी पार पडलेल्या शपथविधी मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता हा मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी 15 डिसेंबर रोजी नागपुरात होणार आहे.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे यांचा 19 डिसेंबर रोजीचा पूर्वनिर्धारित कार्यक्रम रद्द झाला आहे. त्याऐवजी राज्यपाल15 ते 17 डिसेंबर दरम्यान नागपूर दौऱ्यावर आहेत. तर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनही 16 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. तत्पूर्वी 15 डिसेंबर रोजी नागपुरात बहुतेक आमदार पोहचणार आहेत. त्यामुळे हा शपथविधी 15 तारखेला दुपारी 3.30 वाजता नागपुरातील राजभवनात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . दरम्यान रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यामुळे नागपुरातही घडमोडींना वेग आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाबाबत अद्यापही संभ्रम कायम असल्याची माहिती समोर आली आहे. नगरविकास, पर्यटन आणि एमएसआरडीसी यासारखी महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे . मात्र, महसूल खात्याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.
भाजपकडे गृह, गृहनिर्माण, ऊर्जा, ग्रामीण विकास आणि पर्यावरण यासारखी खाती असतील.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (अजित पवार) अर्थ, सहकार, कृषी, महिला आणि बालविकास ही खाती राहतील. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खात्यांमध्ये लहानसहान बदल होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ४३ मंत्रिपदे असतील. निवडणूक निकालांनुसार, भाजपला १३२ जागा, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४१ जागा मिळाल्या. त्यानुसार, भाजपला २१, शिवसेनेला १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.