आयएएस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आलेला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेणाऱ्या पूजा खेडकर दिल्ली उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे.पूजा खेडकरने देशाच्या प्रतिमेला धक्का लावला आहे, अशा कडक शब्दांत न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढले आहेत.न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांच्या खंडपीठाने आज हा आदेश दिला आहे.
न्यायालयाने म्हटले की, प्रथमदर्शनी UPSC ने केलेला फसवणुकीचा आरोप खरा असल्याचे दिसत आहे. पूजा खेडकर ही अपंग आणि ओबीसी प्रवर्गातील लाभ मिळण्यास पात्र नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.या प्रकरणी न्यायालयाने 28 नोव्हेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता.
या प्रकरणी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) खेडकर हिने न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप करणारी याचिकाही दाखल केली होती. यूपीएससीने म्हटले होते की, खेडकर हिने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात यूपीएससीने त्यांचे बायोमेट्रिक्स गोळा केल्याचे खोटे विधान केले आहे.
यूपीएससीने अद्याप कोणत्याही उमेदवाराचे बायोमेट्रिक्स घेतले नसल्याचे सांगितले होते. अशा स्थितीत पूजा खेडकर हिचे प्रतिज्ञापत्र खोटे आहे. आपल्या बाजूने निर्णय व्हावा म्हणून खेडकर यांनी खोटे प्रतिज्ञापत्र दिले आहे. खेडकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या पतियाळा हाऊस कोर्टाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
परिक्षाकाळात बेकायदेशीर मागण्या केल्यामुळे पूजा खेडकर वादात सापडली होती. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी खेडकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. वाद वाढल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने पूजा खेडकरवर कारवाई करून तिच्या प्रशिक्षणावर बंदी घातली आणि खेडकरला फील्ड पोस्टिंगमधून काढून टाकण्यात आले आणि मसुरीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) मध्ये अहवाल देण्याचे आदेश दिले, परंतु ती वेळेवर परत आली नाही. 18 जुलै रोजी पोलिसांनी पूजा खेडकरच्या आईला अटक केली होती. तिच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती मुळशीतील काही शेतकऱ्यांना त्यांची जमीन हडप करण्यासाठी पिस्तुलाने धमकावताना दिसत होती. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
विशेष म्हणजे पूजा खेडकर हिलाही यूपीएससीने डिसमिस केले आहे. पूजा खेडकर यांनी बरखास्तीला हायकोर्टात आव्हान दिले असून याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे मिळाल्याचे सांगितले होते.
नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये पूजा खेडकर हिने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे तपासात समोर आले आहे. युपीएससीने असेही म्हटले आहे की, पूजा खेडकर हिने नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये तिचे नाव, पालकांचे नाव, फोटो, ईमेल आयडी, फोन नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख लपवली. बनावट कागदपत्रांचा वापर करून ती तब्बल अकरा वेळा यूपीएससी परीक्षेला बसल्याचेही समोर आले आहे.