दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. 5 फेब्रुवारीला ७० विधानसभा जागांसाठी मतदान इथे पार पडणार आहे. यामध्ये आम आदमी पार्टी,काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत बघायला मिळणार असून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी मैदानात आपली पूर्ण ताकद लावलेली दिसत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एकीकडे भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे . तर दुसरीकडे भाजपनेही केजरीवालांवर निशाणा साधत, आज तब्बल २२ रोड-शोचे नियोजन केले असल्याची माहिती समोर येत आहे.
आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिल्ली मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, तर आप संस्थापक अरविंद केजरीवाल आणि असदुद्दीन ओवैसींसह अनेक दिग्गज नेते सभा घेणार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या ८ आमदारांनी दुसर्याच दिवशी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पालम येथील आमदार भावना गौर यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहीत आपण पक्षावरील विश्वास गमावल्याने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा देत भाजपच्या दिल्लीतील विजयाबद्दल त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे. आठ फेब्रुवारीला दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होईल आणि आठ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाआधी महिलांना अडीच हजार रुपये मिळण्यास सुरुवात होईल,’ असे मोदी म्हणाले आहेत.