गोविंदपुरी पोलिसांनी सीएम आतिशी यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतिशी यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
खरं तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी कालकाजी विधानसभा मतदारसंघात काल रात्री गोंधळ उडाला होता. यावेळी दोन्ही पक्षांनी म्हणजेच भाजपा आणि आपने एकमेकांविरुद्ध कालकाजी मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आणि धमकवल्याचा आरोप आहे. यादरम्यान, दिल्लीच्या मुख्यामंत्री आतिशी या मध्यरात्री गोविंदपुरी पोलीस ठाण्यात पोहचल्या व त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, भाजप कार्यकर्त्यांकडून काल कालकाजी मतदारसंघात नागरिकांना धमकवण्याचा प्रकार घडला आहे. तर दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांनी आतिशी यांच्यावर मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. दाखल केलेल्या दोन्ही तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी अतिशी यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही प्रकरणं आचारसंहिता भंगाशी संबंधित असल्याचे म्हंटले आहे. यापैकी एक गुन्हा सीएम आतिशी यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. आतिशी या 50-60 समर्थकांसह 10 वाहनांमध्ये फतेह सिंग मार्गावर पोहोचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी यावेळी हे आचारसंहितेचे उलंघन असल्याचे म्हणत इथून जाण्यास सांगितले मात्र, त्यांनी यासाठी नकार दिला.
अशास्थितीत निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून आतिशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्हा आतिशी यांच्या समर्थकांवर दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्हिडिओमध्ये आतिशी यांचा समर्थक सागर मेहता एका पोलिसांशी गैरवर्तन करताना दिसत आहे.
दिल्लीत उद्या होणार मतदान
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहेत. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत आणि कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी किमान 36 जागांची आवश्यकता आहे. अशास्थितीत दिल्लीतील राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे.