केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी असेच काहीसे वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी नितीन गडकरी यांनी वाढत्या अपघातांना सिव्हिल इंजिनीअर जबाबदार असल्याचे म्हंटल आहे.
यावेळी त्यांनी रस्ते अपघातात ज्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त केला. नंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग व रस्ते तयार करणारे सिव्हिल इंजिनियर आणि कंत्राटदार यांना दोष देत आपली कामं हे लोक नीट करत नसल्याने अपघाताच्या घटना वाढत असल्याचे म्हंटले आहे.
गडकरी म्हणाले, ‘भारतात अनेकांना रस्ते अपघातांशी संबंधित अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. हे आपल्यासाठी चांगले नाही. दरवर्षी आपल्याकडे 4 लाख 80 हजार रस्ते अपघात आणि 1 लाख 80 हजार मृत्यू होतात. जे कदाचित जगात सर्वाधिक आहे. या मृत्यूंपैकी 66.4 टक्के 18 ते 45 वयोगटातील लोक आहेत. हे खूप दुःखद आहे.
डॉक्टर, अभियंते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रतिभावान तरुण असे अपघातात गमावणे हे आपल्या देशाचे खरोखरच मोठे नुकसान आहे. या सर्व अपघातांचे सर्वात मोठे दोषी सिव्हिल इंजिनीअर आहेत. मी प्रत्येकाला दोष देत नाही, परंतु 10 वर्षांच्या अनुभवानंतर मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे. असं गडकरी म्हणाले आहेत.
दरम्यान, जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने अपघाताबाबत मोठी घोषणा केली होती. याअंतर्गत रस्ते अपघातात जखमींना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तींना 25 हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. जी आधी 5 हजार होती.
पुढे ते म्हणले, ‘रस्ते अपघात थांबवायचे असतील तर आपण एकटे काहीही करू शकत नाही. यासाठी शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, खेळाडू, सेलिब्रेटी आणि इतर लोक जेव्हा एकत्र येऊन जनजागृती निर्माण करतील तेव्हा बदल घडू शकतो. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.