बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर ‘मी टू’ चळवळीदरम्यान लैंगिक छळ आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यासह आणखी तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
आता न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला असून, यात नाना पाटेकर यांना दिलासा देण्यात आला आहे. तक्रार दाखल करण्यासाठी उशीर झाल्याचे कारण न्यायालयाने दिले.
ऑक्टोबर 2018 मध्ये तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि इतर तिघांवर 2008 मध्ये आलेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगदरम्यान छळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणात, 2019 मध्ये, पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले होते की, ‘त्यांनी या प्रकरणाचा तपास केला, परंतु आरोपींविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत.’
पोलिसांनी यासंबंधिचा ‘बी-समरी’ अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालानुसार एफआयआर खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तनुश्रीने या अहवालाविरोधात निषेध याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये तिने न्यायालयाकडे तपास पुढे नेण्याची मागणी केली होती.
यावर न्यायदंडाधिकारी निलेश बन्सल म्हणाले आहेत की, ‘तनुश्री यांनी 2018 मध्ये दाखल केलेला एफआयआर 2008 मध्ये घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 509 अंतर्गत अशा गुन्ह्यांची नोंद तीन वर्षांच्या आत करण्याची मर्यादा आहे.’ असं दंडाधिकारी यांनी स्पष्ट केलं.
तनुश्री दत्ताने 2018 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा खुलासा केला होता. ‘मी टू’ चळवळीमुळे हे प्रकरण खूप चर्चेत आले होते. इतरही अनेक अभिनेत्रीही या चळवळीत पुढे आल्या होत्या. आणि त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल उघडपणे सांगितले होते.
न्यायालयाने सांगितले की, ‘तक्रार करायला का उशीर झाला याचे कारण दिले गेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेतली जाऊ शकत नाही. असे न्ययालयाने स्पष्ट केलं आहे.