आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्वत्र वेगेवगेळ्या मोहीम राबवल्या जात आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेने देखील एक खास उपक्रम हाती घेत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. भारतीय रेल्वेच्या या उपक्रमाद्वारे महिला कोणत्याही कामात मागे नाहीत हे दाखवण्यात आले आहे.
महिला दिनानिमित्ताने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही महिलांनी चालवली आहे. या खास उपक्रमात ट्रेनचे लोकोपायलट, असिस्टंट लोकोपायलट, ट्रेन मॅनेजर, तिकीट परीक्षक आणि ऑन-बोर्ड केटरिंग कर्मचारी या सर्व महिला आहेत.
ही विशेष ट्रेन सीएसएमटीहून साईनगर शिर्डीसाठी रवाना झाली, ज्यामध्ये महिलांच्या साहस आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले. महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. या उपक्रमामुळे रेल्वेतील महिलांच्या सहभागाला आणखी प्रोत्साहन मिळेल.
पश्चिम रेल्वेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही कामगिरी शेअर करून महिला शक्तीला सलाम केला आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही महिलांना प्रत्येक पावलावर साथ देतो आणि त्यांच्या प्रगतीच्या प्रवासात त्यांच्या पाठीशी उभे आहोत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांच्या जिद्द, सामर्थ्याला आणि कर्तृत्वाला सलाम करतो.’ अशी पोस्ट करण्यात आली आहे.
दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि कौतुक करण्याची संधी आहे. आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा उत्सव म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात 1909 मध्ये झाली होती व त्याला 1975 मध्ये अधिकृत मान्यता मिळाली होती.