परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी उत्तर आयर्लंडमधील बेलफास्ट येथे भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले आहे. या प्रदेशातील भारतीयांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच भारत आणि ब्रिटनमधील राजनैतिक, व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने देखील याठिकाणी दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याला अनेक दिग्गज नेते आणि मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनाच्यावेळी जयशंकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीला जयशंकर यांनी भारत-ब्रिटन संबंधातील एका नव्या युगाची सुरुवात असे वर्णन केले.
यावेळी जयशंकर यांनी ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाचे देखील कौतुक केले आहे. तसेच या दूतावासामुळे भारतीय समुदायाला अधिक चांगल्या सेवा आणि सुविधा पुरविण्यात मदत होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
आपल्या भाषणात जयशंकर पुढे म्हणाले, ‘बेलफास्ट हे भारताच्या ब्रिटन आणि युरोप धोरणासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल. हे दूतावास येथे राहणाऱ्या भारतीयांसाठी राजनैतिक मदतीचे एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देईल.’
तसेच बेलफास्ट हे व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने एक महत्वाचे ठिकाण आहे जे भारताला ब्रिटन आणि युरोपियन युनियन या दोन्ही देशांशी जोडते. असंही जयशंकर म्हणाले आहेत.
भारत-ब्रिटन भागीदारीला चालना मिळेल
या नव्या उपक्रमामुळे भारत आणि ब्रिटनमधील व्यावसायिक संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. दूतावासाच्या स्थापनेमुळे केवळ द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळणार नाही तर शिक्षण, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या क्षेत्रातही नवीन संधी उपलब्ध होतील. भारत सरकारच्या या पाऊलामुळे बेलफास्टमधील व्यावसायिक क्रियाकलापांचा विस्तार तसेच भारतीयांसाठी सुविधा सुधारण्यास मदत होईल.