मागील काही महिन्यांपासून शांततेकडे वाटचाल करणार्या मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. मणिपूरमधील कुकीबहुल भागात निदर्शकांनी बेमुदत संपाची घोषणा केल्यानंतर रविवारी याठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले. विशेषत: कांगपोकपी जिल्ह्यात परिस्थिती तणावपूर्ण आहे. याठिकाणी परिस्थिती बिघडू नये म्हणून अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
गृहमंत्रालयाने दिलेल्या सुचनेनंतर, कुकी आंदोलकांनी शनिवारपासून राज्यात आंदोलनं सुरू केली आहेत. या आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत एकाचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
शनिवारपासून राज्यातील कुकीबहुल भागात सर्व दुकाने बंद आहेत तर रस्त्यांवर देखील शांतता आहे. आंदोलकांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
निदर्शक मणिपूरमधील मुक्त संचारबंदीच्या विरोधात निदर्शने करत आहेत. खरं तर, १ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सुरक्षा दलांना मणिपूरमधील सर्व मार्गांवर मुक्त हालचाल सुरू करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही सांगितले होते. मात्र, रस्ते उघडताच मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला.
कुकी जो कौन्सिलने शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व कुकी परिसर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. कुकी-जो कौन्सिलने सरकारला तणाव आणि हिंसक संघर्ष आणखी वाढू नये म्हणून त्यांच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. पुढे त्यांनी बफर झोनमध्ये मेइतेई लोकांच्या मुक्त हालचालीची हमी आम्ही देऊ शकत नाही आणि कोणत्याही अनुचित घटनेची जबाबदारी घेऊ शकत नाही. असेही असेही म्हटले आहे.