गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. धंगेकर यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला असून, लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
याबाबत धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत स्वतः माहिती दिली आहे. आज ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून, लवकर शिवसेनेत प्रवेश करतील असं म्हंटल आहे. अशातच पुण्यात हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘पक्ष सोडताना दुःख होत आहे. माझी कॉंग्रेस पक्षावर नाराजी नाही. मात्र, सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत. शिंदे आणि सामंत यांना भेटलो आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. मी आज प्रवेश करणार आहे. आज सायंकाळी 7 वाजता मी पुन्हा एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. कार्यकर्ते आणि मतदारांचा आदर करूनच प्रवेश करणार आहे.’ अशी माहिती धंगेकर यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर आमने-सामने होते. मात्र, यात मोहोळ यांनी धंगेकर यांचा पराभव केला. नंतर विधानसभेत देखील धंगेकर यांना हेमंत रासने यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही निवडणुकीत मिळालेल्या उपयशानंतर आता धंगेकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.