बँक ऑफ कॅनडा व बँक ऑफ इंग्लंडचे माजी प्रमुख मार्क यांची कॅनडाच्या सत्ताधारी लिबरल पक्षाचे नवे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यासह कार्नी देशाचे पुढील पंतप्रधान असणार आहेत. कार्नी हे आता जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील, ज्यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली व्यक्ती कॅनडाचे पंतप्रधान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मार्क कार्नी हे आता कॅनडाचे २४ वे पंतप्रधान असतील. लिबरल पक्षात ट्रुडो यांची जागा घेण्यासाठी मार्क कार्नी सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. 2008 च्या आर्थिक संकटातून कॅनडाला कार्नी यांनीच बाहेर काढले होते. त्यानंतर ते चर्चेत आले होते. अशास्थितीत आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यासाठी मार्क कार्नी यांना सर्वोत्तम नेता मानले जात आहे.
ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आल्यानंतर त्यांनी कॅनडावर अनेकदा भाष्य केलं आहे. तसेच ट्रम्प यांनी कॅनडावर टॅरिफ कर लावणार असलायचं देखील बोललं आहे. अशास्थितीत मार्क कार्नी हे ट्रम्प यांच्याशी याविषयी चर्चा करून योग्य मार्ग काढतील असं बोललं जात आहे.
कोण आहेत मार्क कार्नी ?
कॅनडाच्या राजकारणात वेगाने उदयास आलेले ५९ वर्षीय मार्क कार्नी हे एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि माजी केंद्रीय बँकर आहेत. २००८ च्या आर्थिक संकटादरम्यान मार्क कार्नी हे बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर होते आणि त्यांनी देशाचे व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे केले. यानंतर ते बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नरही झाले, त्यानंतर ते जगभर प्रसिद्ध झाले. सार्वजनिक सेवेत येण्यापूर्वी त्यांनी गोल्डमन सॅक्स येथे गुंतवणूक बँकिंगमध्ये काम केले. जेव्हा मार्क कार्नी यांना इंग्लंडच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर बनवण्यात आले तेव्हा तेथील सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे कौतुक केले. त्यानंतर ते अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. २०२० मध्ये बँक ऑफ इंग्लंडमधून पायउतार झाल्यानंतर मार्क कार्नी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्येही काम केले. इतका अनुभव असूनही, मार्क कार्नी यांनी कधीही निवडणूक लढवली नाही किंवा कॅनडाच्या संसदेतही नव्हते.