पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा दोन्ही देशांसाठी फार महत्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान ११ मार्च ते १२ मार्च रोजी देशाच्या ५७ व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तसेच दोन दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान अनेक कार्यक्रमांना देखील हजेरी लावणार आहेत.
मोदींच्या या दौऱ्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे भारत आणि मॉरिशस यांच्यातील संबंध आणखी मजबूत करणे आहे. तसेच दोन्ही देशांमधील सहकार्यास प्रोत्साहन देण्यासाठी देखील हा दौरा महत्वाचा आहे.
काही दिवसांपूर्वी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलम यांनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवले होते. पंतप्रधान मोदींनी हे निमंत्रण स्वीकारत आज ते मॉरिशसला पोहचले आहेत.
मॉरिशसला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर याबाबत माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये मोदींनी या भेटीबद्दल लिहिले की, ‘मॉरिशस हा एक जवळचा शेजारी आणि हिंद महासागराचा एक प्रमुख भागीदार देश आहे. आम्ही सामायिक मूल्ये व सांस्कृतिक संबंधांशी संबंधित आहोत. माझा प्रवास आमच्या मैत्रीचा पाया आणखी मजबूत करेल.’ असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केला. ही भेट भूतकाळातील पायावर आधारित असेल आणि भारत आणि मॉरिशस संबंधात एक नवीन आणि उज्ज्वल अध्याय सुरू करेल. असंही मोदींनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पंतप्रधान मोदींनी दुसर्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘मी माझा मित्र व पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांना भेटण्यास उत्सुक आहे. मी तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधण्यास देखील उत्सुक आहे. तसेच मॉरिशसच्या नेतृत्वाबरोबर भागीदारी वाढवण्याची संधी मला मिळेल, ज्यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील. तसेच, हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा आणि विकासासाठी आमची मैत्री अधिक मजबूत होईल, जो व्हिजन सागरचा भाग आहे,’ असंही पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 2015 मध्ये मॉरिशसला भेट दिली होती. त्यानंतर आता २०२५ मध्ये पंतप्रधान मॉरिशसचा दौरा करत आहेत.