Prashant Koratkar : मुंबई उच्च न्यायालयात आज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी देणारा नागपूरस्थित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जाविरोधात सुनावणी होणार आहे. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या अपीलावर ही सुनावणी असेल. सकाळच्या सत्रात ही सुनावणी होईल. या सुनावणीसाठी प्रशांत कोरटकर याला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुनावणीत त्याचा जामीन रद्द होणार की नाही हे समजेल.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याप्रकरणी आणि शिवाजी महाराजांविरोधात अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर अनेकांकडून टीका केली जात आहे.
दरम्यान त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून आज उच्च न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जाविरोधात सुनावणी होणार आहे. मध्यंतरी प्रशांत कोरटकर हा मध्य प्रदेशात पळून गेला असल्याचे देखील समोर आले होते. त्याच्या पत्नीने जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावरच आता सुनावणी होणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात सरकारने सक्रियता दाखवल्यामुळे कोरटकरच्या अटकेची शक्यता वाढली आहे. कोरटकरने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.