राज्याच्या राजकारणात सध्या घोषणाबाजीची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतच एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर समाजात विष पसरवल्याचा आरोप करत आपल्या समर्थकांना भाजपच्या आवडत्या ‘जय श्रीराम’ या घोषणे ऐवजी ‘जय शिवाजी’ आणि ‘जय भवानी’ असे उत्तर द्या असं सांगितलं आहे. मुलुंडमधील एका कार्यक्रमादरम्यान ते शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी असे उद्गार काढले.
उद्धव म्हणाले की, ‘जर कोणी ‘जय श्री राम’ म्हटले तर त्याला ‘जय शिवाजी’ आणि ‘जय भवानी’ असे उत्तर दिल्याशिवाय जाऊ देऊ नका.’ तसेच भाजपने आपल्या समाजात विष पसरवत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
भाजपने आपल्या समाजाचे जे केले आहे त्यासाठी मी त्यांना माफ करणार नाही. त्यांच्यामुळेच मुस्लिमांनी भाजपला मतदान केले. असंही यावेळी ते म्हणाले. पुढे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांबद्दल भाजपच्या भूमिकेचा उल्लेख करत भाजपच्या वचनबद्धतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजप नेते एकेकाळी पाकिस्तानसोबत क्रीडा स्पर्धांना विरोध करत होते, तर आता भारत पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत क्रिकेट सामने खेळत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या ‘मी उद्धव ठाकरे नाही जो चालू असलेले प्रकल्प थांबवेल.’ या वक्तव्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही कधीही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही. जर फडणवीस यांना त्यांचे अनुकरण करायचे असेल तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करावी ‘शिवभोजन’ आणि ‘लाडकी बहीण योजना‘ सारख्या उपक्रमांसाठी सुधारित निधीची तरतूद करावी. असं म्हंटल आहे.