महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी आहे. याठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता नवी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इथून पुढे आता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान करणे बंधनकारक असणार आहे. वेस्टर्न कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
हा नियम पुरूष व महिला दोघांना लागू होणार आहे, मंदिरात कमी कपडे घालून आलेल्या भाविकांना दर्शन मिळणार नाही असं देवस्थान ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फाटलेल्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असे कपडे घालून देव दर्शनास आलेल्या भाविकांना आता गडावर प्रवेश दिला नाही.
मंडळाकडून असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व भाविकांना करण्यात आले असून, या नियमांचे पालन भाविकांनी करावे असं देखील सांगण्यात आलं आहे. दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे, असेही मंदिर ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. आजपासून हे नियम लागू होणार असून, उद्यापासून नियमांचे पालन न करणाऱ्या भाविकांना दर्शन घेता येणार नाही.
दरम्यान, जेजुरी गडावर दरवर्षी लग्नसराईनंतर नवविवाहित जोडपे खंडेरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. तसेच बाराही महिने भाविकांची जेजुरी गडावर गर्दी पाहायला मिळते.