शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा एल्गार पुकारत आज शेतक-यांचा महामोर्चा आझाद मैदानात धडकला आहे. १२ जिल्ह्यांतील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी आहेत. या आंदोलनासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आले आहेत. पण शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प नेमका काय आहे आणि यावरून राज्यात का वाद पेटला पाहूया…
802 किलोमीटर अंतराचा वर्ध्यातल्या पवनारपासून पत्रादेवीपर्यंत जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा 6 लेनचा हायवे असणार आहे. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा बारा जिल्ह्यांमधून जाणार महामार्ग आहे. यात वर्धा यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. यात माहूर, कोल्हापूर, तुळजापूर, अंबेजोगाई, परळी वैजनाथ, पंढरपूर, कांरजा लाड, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदूंबर दत्तगुरुंच स्थान अशी अनेक धार्मिक ठिकाणं या शक्तीपीठ महामार्गाशी जोडली जाणार आहेत.
यासाठी सरकार 8400 हेक्टर जमिनी सरकार ताब्यात घेणार आहे ज्यापैकी 8100 हेक्टर जमीन खासगी मालकीची आहे. आणि यालाच शेतकरी विरोध करत आहेत. जर रस्त्यासाठी जमिनी गेल्या तर आम्ही खायचं काय? शक्तीपीठ महामार्गासाठी आमच्या जमिनी देणार नाही. शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे.
दरम्यान, आझाद मैदानात आमदार सतेज पाटील, राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.