राज्याचे मत्स व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच हिंदू खाटीक समाजातील दुकानदारांना मल्हार सर्टिफेकेशन दिले जाणार असल्याची घोषणा केली होती.
मात्र, जेजुरी येथील श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळातील एका विश्वस्ताने झटका मटण सर्टिफिकेटला मल्हार नाव देण्यास विरोध दर्शवला आहे. यासंबंधित डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर यांनी मंत्री नितेश राणे यांना पत्र देखील पाठवले आहे. मल्हार हे खंडोबाचे नाव असून तो शाकाहारी देव आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
पत्रामध्ये त्यांनी निलेश राणे यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आपण मटन कोणाकडून खरेदी करतोय हे समजेल. मात्र, या उपक्रमाला मल्हार सर्टिफिकेशन असे नाव देण्यात आले आहे. जे चुकीचे आहे. हे नाव बदलण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
खंडोबा हा मूळ शाकाहारी देव असून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची परंपरा आहे. मटन नैवेद्य चालत नाही. त्यामुळे आपण झटका मास सर्टिफिकेटला मल्हार नाव देण्याचा निर्णय रद्द करावा आणि याला दुसरे नाव देण्यात यावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.
नितेश राणे यांनी नुकतीच मटण विक्री दुकानदारांसाठी मल्हार प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. हिंदू समाजासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. यामुळे ग्राहकांना शुद्ध व ताजे मटण मिळेल, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. मल्हार प्रमाणन हे सुनिश्चित करेल की हिंदू खाटिक समुदायाद्वारे मटण पारंपारिक पद्धतीने विकले जात आहे.