Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी देणाऱ्या नागपूर स्थित प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने दिलासा दिला आहे. याप्रकरणी काल सुनावणी पार पडली. न्यायालयाने प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
सुनावणीवेळी प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना द्या अशी मागणी पोलिसांची केली होती. मात्र, पोलिसांची ही मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच आता या प्रकरणी सुनावणी आता 17 मार्च रोजी पार पडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी त्याला याप्रकरणात अंतरिम जामीन मंजूर झाला होता. आता पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरटकरने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.