अमली पदार्थ विक्रीची माहिती देणाऱ्यास 10 हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुण्याला ड्रग्जमुक्त करण्याची मोहीम चंद्रकांत पाटलांनी हाती घेतली आहे. तसेच, व्यसनाधीन व्यक्तींना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे.
मंगळवारी कोथरुड येथील हुतात्मा चौकात अमली पदार्थमुक्त युवा पिढीसाठी विविध संघटनांच्या वतीने निर्दशिने करण्यात आली. यामध्ये कोथरूडकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिवाजी रायगड स्मारक, अंकुर प्रतिष्ठाण, शिवश्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, अग्रेसर आदी संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटलांनी अंमली पदार्थ विक्रीची माहिती देणाऱ्यास 10 हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा केली.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘अमली पदार्थ विरोधात कोथरूडमधील नागरिकांनी एकत्रित सुरु केलेल्या या चळवळीत सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालो आहे. पुढे ते म्हणाले, ‘पोलिस विभागास अमली पदार्थांबाबत खात्रीशीर, ठोस आणि अचूक माहिती पुरविल्यास त्यास मी वैयक्तिकरीत्या त्या व्यक्तीस 10 हजारांचे बक्षीस देईल.’
खरं तर पुण्यात गेल्या काही काळापासून पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचे सर्रास सेवन केले जात आहे. हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. याला कुठे तरी आळा बसला पाहिजे म्हणून पुणेकर वेळोवेळी अमली पदार्थांविरोधात मोहीम राबवतात. दरम्यान, आता चंद्रकांत पाटलांनी यात पुढाकार घेतला असून, पुण्यात बेकायदेशीर विकले जाणाऱ्या अमली पदार्थांवर रोक बसेल हे नक्की.