मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात बुधवारी रात्री अपघाताची मोठी घटना घडली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर तीन जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ही घटना बदनावर-उज्जैन हाईवेवर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. एका भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस टँकरने कार आणि पिकअप या दोन वाहनांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारआणि पिकअप या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या तीन जणांवर बदनावर येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या तीन जणांची प्रकृती देखील गंभीर जखमी असल्याची सांगण्यात येत आहे.
मृतांमध्ये मंदसौर, रतलाम आणि जोधपूर येथील रहिवाशांचा समावेश आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख आणखीन पटली नसून, पोलीस याचा शोध घेत आहेत.
या अपघातामुळे आता रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातातातील वाहने हटवली आहेत. या घटनेने आता पुन्हा एकदा रस्ता सुरक्षा आणि रात्रीच्या वेळी अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलीस आणि प्रशासन आता या प्रकरणाचा कसून तपास करत असून, लवकरच यावर कारवाई करण्यात येईल.
बदनावर पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. दरम्यान, अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात अतिवेग आणि टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहे.