गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये हिंदी आणि तमिळ भाषवरून वाद सुरु आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडूतील स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातील कागदपत्रात भारतीय राष्ट्रीय चलन चिन्ह ‘रुपया’च्या लोगोमध्येच बदल केला आहे. लोगोमध्ये तमिळ भाषेचा वापर करण्यात आला आहे.
तामिळनाडू सरकारने आपल्या अर्थसंकल्पात रुपयाचे अधिकृत चिन्ह ‘₹’ काढून त्याच्या जागी तमिळ भाषेतील ‘ரூ’ चिन्ह वापरले आहे. ज्यामुळे आता नवा वाद पेटला आहे. हिंदी भाषेला विरोध होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
एखाद्या राज्याने रुपयाचे चिन्ह बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे हा मुद्दा आता देशभर चर्चेचा विषय बनला आहे.
रुपया (₹) चे अधिकृत चिन्ह का बदलले?
रुपया (₹) हे देशभरातील भारतीय चलनाचे अधिकृत चिन्ह आहे. जे 2010 मध्ये सरकारने स्वीकारले होते. याचे डिझाईन तामिळनाडूचे प्रसिद्ध डिझायनर उदय कुमार धर्मलिंगम यांनी केले होते.
या चिन्हाला राष्ट्रीय मान्यता मिळाली कारण ते भारतीय तिरंग्यावर आधारित होते. मात्र, आता तामिळनाडू सरकारने ते बदलून तमिळ भाषेत लोगो तयार केला आहे. जे तामिळ भाषेत रुपयाचे प्रतीक मानले जाते.
तामिळनाडू सरकारने हा निर्णय अशावेळी घेतला आहे जेव्हा हिंदी भाषेबाबत वाद सुरू आहे. नुकतेच मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर जबरदस्तीने हिंदी लादल्याचा आरोप केला होता. हिंदीच्या प्रभावामुळे अनेक प्राचीन भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी म्हंटले होते.
हिंदी भाषेवर एम.के. स्टॅलिन यांचे विधान
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले होते की, ‘हिंदीची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नामुळे प्राचीन भाषा नष्ट होत आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेश हे कधीच हिंदी भाषिक क्षेत्र नव्हते, पण आता त्यांच्या मूळ भाषा मागे राहिल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, हिंदी भाषेमुळे इतर अनेक भाषा कमकुवत झाल्या आहेत. त्यांनी मुंडारी, मारवाडी, कुरुख, माळवी, छत्तीसगढ़ी, संथाली, मैथिली, अवधी, भोजपुरी, ब्रज, कुमाऊनी, गढवाली या भाषांची उदाहरणे देत या भाषा आता त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचे सांगितले आहे.