राज्यात नुकतीच बारावीच्या बोर्डाची परीक्षा पार पडली आहे. आता विद्यार्थी वाट बघत आहेत ती निकालाची. पण अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहेत. एका शिक्षिकेच्या घराला आग लागून त्यात बारावी बोर्ड परिक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. यामुळे राज्यात एकच गोधळ उडाला आहे.
ही घटना विरार पश्चिमेच्या बोलींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली. या घटनेमुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या घटनेनंतर आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. मुलांच्या भिवष्याचं काय? त्यांच्या निकालाच काय? अशी प्रश्न विचारली जात आलेत. अशामध्ये आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रया देत यावर लवकरात लवकर कारवाईत करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
दादा भुसे यांनी सांगितले की, ‘बारावी कॉमर्सच्या या १७५ उत्तर पत्रिका आहेत. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या होत्या. त्याचे मार्क्स कॉलेजकडे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही. याप्रकरणाची चौकशी होऊन उत्तर पत्रिका घरी नेणे आणि ज्यांनी त्या घरी घेऊन जाऊ दिल्या, ज्यांच्या घरी जळाल्या त्यांच्यावर कारवाई होईल,” अशीही माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन आलेल्या शिक्षिकेच्या घरात आग लागल्याने उत्तर पत्रिकांना आग लागली. या शिक्षिकेने १२ वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंगसाठी घरी आणले होते. या पेपरचा गठ्ठा त्यांनी सोफ्यावर ठेवला होता. काही वेळाकरिता शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले होते. त्यावेळी शिक्षिकेचं घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली. त्यामध्ये उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.