‘या लोकांनी भारत देश, या देशाची संस्कृती व परंपरेविरोधात कामं केली होती. औरंगजेबाची कबर ही त्यापैकी एक आहे. औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, हिंदूंची मंदिरं पाडली. या मंदिरांमधील संपत्ती लुटली. औरंगजेबाने शिखांच्या नवव्या व दहाव्या धर्मगुरूंची हत्या केली होती. त्याच औरंगजेबाची कबर खुलताबादमध्ये असून एएसआयने ती संरक्षित व संवर्धित केली आहे. भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या एकूण तीन हजार ६९१ स्मारके व कबरींपैकी २५ टक्के वास्तू या मुघल व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावाने उभारलेल्या आहेत. औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? औरंगजेबासह भारताविरोधात कामे केलेल्या सर्वांची स्मारके व कबरी नष्ट करायला हव्यात.’ अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केली आहे.
खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुघल बादशाह औरंगजेब याचा छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या कबरीचा मुद्दा चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर तिथून हटवण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अशातच आता खासदार नरेश म्हस्के यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा संसदेत उपस्थित करत औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या मुद्द्याने राजकारण तापलं आहे. नुकतच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजेब क्रूर शासक नव्हता’, असं म्हंटल होत. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. नंतर आझमी यांनी आपले शब्द मागे घेतले होते. पण त्यांना त्यांच्या वक्तव्यामूळे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभेतून निलंबन करण्यात आल आहे.
.