श्री मल्हार म्हणजेच श्री खंडेराया हे सबंध देश व महाराष्ट्रातील अखंड हिंदू समाजाचे कुलदैवत आहे. आणि प्रत्येक मल्हार भक्त हा आपल्या कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कुलदैवतेच्या साक्षीने व त्यांचे स्मरण करूनच करतो. प्रसार माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांमधून असे निदर्शनास आले की, हिंदू समाजाद्वारे मांस मटण विक्रीसंदर्भात मल्हार सर्टिफिकेट योजना सुरु करण्यात येत आहे. श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्या माननीय विश्वस्त मंडळामध्ये साधक-बाधक चर्चा झाली व या निर्णयासंबंधी सर्व बाजूनी विचार करून माननीय विश्वस्त मंडळाने बहुमताने असा निर्णय घेतला की, या योजनेला मल्हार हे नाव देण्यास आपत्ती / आक्षेप असण्याचे कोणतेही कारण नाही. या निर्णयाचे आम्ही स्वागतच करत आहोत. माननीय विश्वस्त मंडळाने या निवेदनाद्वारे यासाबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
खरं तर राज्याचे मत्स व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच हिंदू खाटीक समाजातील दुकानदारांना मल्हार सर्टिफेकेशन देणार असल्याची घोषणा केली होती. परंतु जेजुरी येथील श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळातील एका विश्वस्ताने नितेश राणे यांना पत्र लिहून त्यांच्या या उपक्रमाला मल्हार नाव देण्यास विरोध दर्शवला होता. यासंबंधित डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर यांनी मंत्री नितेश राणे यांना पत्र देखील पाठवले होते. मल्हार हे खंडोबाचे नाव असून तो शाकाहारी देव आहे. खंडोबा हा मूळ शाकाहारी देव असून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची परंपरा आहे. मटन नैवेद्य चालत नाही. त्यामुळे आपण मल्हार नाव देण्याचा निर्णय रद्द करावा आणि याला दुसरे नाव देण्यात यावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली होती.
मात्र, आता मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने एक निवेदन सादर करत या निर्णयाचे स्वागत केले आहे व नितेश राणे यांच्या या उपक्रमाला मल्हार नाव देण्यास संमती दर्शवली आहे.
नितेश राणे यांनी नुकतीच मटण विक्री दुकानदारांसाठी मल्हार प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. हिंदू समाजासाठी हे महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे ग्राहकांना शुद्ध व ताजे मटण मिळेल, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. मल्हार प्रमाणन हे सुनिश्चित करेल की हिंदू खाटिक समुदायाद्वारे मटण पारंपारिक पद्धतीने विकले जात आहे.