लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मालेगावमध्ये ‘व्होट जिहाद’साठी बाहेरून पैसा आला होता असा आरोप सध्या होत आहे. माजी आमदार आसिफ शेख यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील यासंबंधित आवाज उठवला होता. मालेगावात १२५ कोटी वोट जिहादसाठी आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
माजी आमदार आसिफ शेख यांनी मालेगावमध्ये ज्या जागेवर एआयएमआयएमने विजय मिळवला होता, तिथे बाहेरून पैसे आल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपल्या दाव्याचे पुरावे सादर करण्याबाबतही बोललं आहे.
माजी आमदार आसिफ शेख यांनी मालेगावातील दोन्ही निवडणुकीत बाहेरून मोठ्या प्रमाणात पैसा आल्याचा आरोप केला आहे. या सर्व बाबींची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देणार असल्याचं देखील सांगितलं आहे. या सर्व आरोपांबाबत आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
सरकारने या सर्व प्रकरणांची ईडी, एटीएस, लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करून घ्यावी, अशी मागणी माजी आमदार शेख यांनी केली आहे. हे पैसे कोणी आणि कशासाठी वापरले हे तपासात समोर येईल, असं ते म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण?
विधानसभा निवडणुकीच्या काळात मालेगाव मर्चंट बँकेच्या खात्यात अचानक 125 कोटी रुपये जमा झाल्याने खळबळ उडाली होती. किरीट सोमय्या यांनी याबाबत आवाज उठवला होता. एवढा पैसा कुठून आणि कशासाठी आला, अशी विचारणा त्यांनी केली होती. तेव्हा हा पैसा व्होट जिहादसाठी वापरण्यात आल्याचा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला होता. आता सोमय्या यांच्या दाव्यानंतर माजी आमदार आसिफ शेख आवाज उठवल्यानंतर सोमय्या यांच्या दाव्याला बळ मिळत आहे.