रत्नागिरी जिल्ह्यात होळीच्या निमित्ताने गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही हिंदू लोक मशिदीच्या गेटजवळ लाकडी ओंडका घेऊन जाताना दिसत होते. हा व्हिडिओ पाहून असदुद्दीन ओवेसी आणि काही इस्लामिक गटांनी हिंदूंनी मशिदीवर हल्ला केल्याचा दावा केला.
हा व्हिडिओ अल्ट न्यूजचा मोहम्मद जुबेर याच्याकडून शेअर करण्यात आला. आणि या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘हा लाजिरवाणा व्हिडिओ महाराष्ट्रातील राजापूर शहरातून समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की होळीच्या वेळी लोक लाकडी ओंडका घेऊन मशिदीजवळ पोहोचले मशिदीच्या आत जाण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी आणि पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय प्रसारमाध्यमे नेहमीच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. अशी पोस्ट लिहत त्याने व्हिडिओ शेअर केला.
जुबेरच्या पोस्टनंतर अनेक मीडियानेही हा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर काही कट्टरतावादी गटानेही हा व्हिडिओ शेअर केला. त्यांनतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी देखील ट्विट करून कायदा स्वतःचं मार्ग स्वीकारणार का? असा सवाल केला आहे. आणि पोलिसांसमोर मशिदीवर झालेला हा हल्ला लज्जास्पद असल्याचे म्हंटल.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचे रत्नागिरी पोलिसांनी खंडन केले आहे. आणि असं काहीही घडलं नसल्याचं त्यांनीस्पष्ट केलं आहे. पोलिसांनी मशिदीत कोणीही जबरदस्तीने प्रवेश केला नसल्याचे सांगितले आहे. ज्या व्यक्तीने हा चुकीचा व्हिडिओ पहिल्यांदा पोस्ट केला होता त्याची पोस्ट आता काढून टाकण्यात आली आहे. असं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं. हा सगळा प्रकार कोकणातील जुन्या परंपरेचा भाग होता, त्यात काहीही चुकीचे नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता जवाहर चौकात हा सर्व प्रकार घडला. शिमग्याची मिरवणूक चालली होती, ही मिरवणूक ‘मडाची मिरवणुक’ म्हणून ओळखली जाते. ही मिरवणूक लांब सडक लाकूड घेऊन काढली जाते. मिरवणूक साखळकरवाडीपासून सुरू होते आणि दोन किलोमीटर अंतरावरील धोपेश्वर मंदिरापर्यंत जाते. या काळात मिरवणूक मशिदीच्या पायऱ्यांवर थांबते आणि याचं लाकडाने मशिदीच्या दाराला स्पर्श केला जातो. मुस्लिम लोक देखील नारळ अर्पण करत त्याचे स्वागत करतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा तोच व्हिडिओ आहे. ज्याला चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर मांडण्यात आले आहे. कोकणातील ही फार जुनी परंपरा आहे. जी आजही चालू आहे.