पंजाबमधील मोगा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मंगल राय मंगा यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंगल राय मंगा हे प्रदीर्घ काळ शिवसेनेशी संबंधित होते. गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मंगा हे दूध घेण्यासाठी मोगा येथील गिल पॅलेसजवळील एका डेअरीत गेले असता, तिघांनी त्याच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली.
सुरुवातीला जेव्हा मंगल राय यांच्यावर गोळीबार केला असता ती गोळी एका ११ वर्षीय मुलीला लागली. आपल्यावर गोळीबार झाला असल्याचे कळताच मंगल राय हे आपली गाडी सोडून तेथील पळून गेले. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला आणि स्टेडियम रोडवर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमी 11 वर्षीय मुलीला उपचारासाठी मोगा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
विश्व हिंदू शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगिंदर शर्मा यांनी यासंबंधित माहिती देत मंगल राय मंगा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते आणि त्यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे सांगितले आहे.
मंगल राय मंगा यांच्या मुलीने सांगितले की, वडील रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दूध आणण्यास सांगून घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी आलेच नाहीत. 11 वाजता वडिलांना गोळी लागल्याची माहिती कोणीतरी दिली ज्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. अशी प्रतिक्रिया मंगा यांच्या मुलीने दिली व न्यायाची मागणी केली आहे.