यावर्षी १४ मार्च रोजी, होळी आणि रमजानची शुक्रवारची नमाज एकाच वेळी आली होती. अशा परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क होते. उत्तर प्रदेश प्रशासनाकडून देखील यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळेत बदल करण्यात आला. तसेच ७ जिल्ह्यांमध्ये, मशिदी, मदरसे यांना रंगांपासून संरक्षण देण्यासाठी कपडा झाकण्यात लाला.
मात्र, पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी उत्तर प्रदेश सरकारवर राज्यातील वातावरण बिघडवल्याचा आरोप केला. होळीच्या पार्श्वभूमीवर मशिदीवर कपडा झाकल्याने त्यांनी योगी सरकारवर संताप व्यक्त केला.
“देशभरातील वातावरण बिघडत आहे. पूर्वी होळी आनंदाने साजरी केली जात होती आणि हिंदू आणि मुस्लिम एकत्र ईद साजरी करत होते . आता, वातावरण बिघडवले आहे, विशेषतः उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी. मुस्लिमांशी ज्या प्रकारची वागणूक दिली जात आहे ती खूप चुकीची आहे. हा देश गंगा-जमुनी तहजीबचा होता आणि हिंदू आणि मुस्लिम एकत्र आनंदाने राहत होते. पण आता ते विष पसरवत आहेत. त्याचा परिणाम खूप वाईट होईल,” असं मुफ्ती यांनी पत्रकारांना सांगितले आहे. देवाने योगी आदित्यनाथ यांना बुद्धी द्यावी जेणेकरून ते हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांच्या विरोधात उभे करू नये. असंही त्या यावेळी म्हणाल्या.
पुढे त्यांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला. यावेळी मेहबुबा मुफ्ती म्हणल्या, ‘भाजप सरकार देशाला जातीयवादाच्या आगीत ढकलत आहे. सरकार गरिबांना अन्न देऊ शकत नाही म्हणून मुस्लिमांवर अत्याचार करून देशाचं लक्ष हटवण्याचे काम करत आहे. असा आरोप त्यांनी केला.