पंजाबमधील अमृतसरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खंडवाला परिसरात असलेल्या ठाकूरद्वार मंदिरावर शुक्रवारी रात्री उशिरा ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार दोन तरुणांनी मंदिरात ग्रेनेड फेकले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, पोलिस अधिकारी यावर काहीही बोलण्याचे टाळत आहेत.
एका मोटारसायकलवरून दोघेजण येत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यापैकी एकाच्या हातात झेंडाही आहे. दोघेही काही वेळ मंदिराबाहेर उभे राहतात आणि नंतर ग्रेनेड फेकून पळून जातात. असं सीसीटीव्हीत दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 12.35 च्या सुमारास हा हल्ला झाला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंदिरावर हा हल्ला झाला तेव्हा मंदिरातील पुजारी मंदिरातच झोपलं होते. पण सुदैवाने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत भुल्लर यांनी मंदिरावरील हल्ल्यावर सांगितले की, ‘पाकिस्तान वेळोवेळी अशा कारवाया करत असतो. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत आणि आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’
मंदिरावरील हल्ल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी अशा घटना घडवून आणल्या जातात. पंजाबमध्ये पोलीस सक्रिय असून याप्रकरणी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असं त्यांनी म्हंटल आहे.