पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. ते शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की येत्या ६ एप्रिल रोजी म्हणजेच राम नवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये सुमारे २००० रामनवमीच्या रॅलीं होतील. त्यामध्ये तब्बल १ कोटींहून अधिक हिंदू सहभागी होतील. यंदाची राम नवमी ही बंगाल मधील सगळ्यात मोठी राम नवमी असेल. असेही ते पुढे म्हणाले.
बंगालमधल्या पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यात त्यांचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राम येथे एका कार्यक्रमात बोलताना अधिकारी यांनी रामनवमी आयोजकांना रॅली काढण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊ नये असे आवाहन केले. याचे कारण देताना ते म्हणाले की आपल्याला भगवान रामाची प्रार्थना करण्यासाठी परवानगीची अजिबात आवश्यकता नाही.
तसेच गेल्या वर्षी, सुमारे ५० लाख हिंदूंनी सुमारे १००० रामनवमी रॅलींमध्ये भाग घेतला होता. यावर्षी, ६ एप्रिल रोजी २,००० रॅली काढून राज्यभरात किमान १ कोटी हिंदू रस्त्यावर उतरतील, असे ते म्हणाले.
दरम्यान, रॅली काढण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊ नका. भगवान रामाची प्रार्थना करण्यासाठी आम्हाला परवानगीची आवश्यकता नाही. आम्ही शांत राहू. परंतु इतरांनीही शांतता राखावी हे प्रशासनाचे काम आहे,” असे त्यांनी कोणत्याही समुदायाचे नाव न घेता सांगितले. अधिकारी पुढे म्हणाले की या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या मतदारसंघातील सोनाचुरा येथे राम मंदिर बांधले जाईल.
तर दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष सीपीआय(एम) ने अधिकारी यांच्या वक्तव्यावर टीका केली आणि त्यांच्यावर “विभाजन आणि धर्माचे राजकारण” करण्याचा आरोप केला.
पश्चिम बंगालचे मंत्री आणि ज्येष्ठ टीएमसी नेते फिरहाद हकीम म्हणाले की “राज्यातील लोक अधिकारी यांच्यासारख्या भाजप नेत्यांच्या कोणत्याही वक्तव्याने प्रभावित होणार नाहीत. प्रत्येकाला धार्मिक विधी पाळण्याचा आणि त्यांना हवे तसे सण साजरे करण्याचा अधिकार आहे. रामकृष्ण, विवेकानंद, श्री चैतन्य आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमीत, लोकांना राष्ट्रवादाच्या विधानांनी प्रभावित केले जाऊ शकत नाही. ज्यांना राम नवमीच्या रॅली काढायच्या आहेत ते तसे करतील. त्यांना अधिकाऱ्यांच्या प्रलोभनाची गरज नाही,” असही हकीम म्हणाले.