दक्षिण काकेशसमधील आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये चार दशकांहून सुरु असलेला संघर्ष आता संपुष्टात येणार आहे. दोन्ही देशांनी शांतता करारासाठी संमती दर्शवली आहे. यासंबंधित दोन्ही देशांनी एक अधिसूचना देखील सादर केली आहे.
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून हे दोन्ही देश एकमेकांशी युद्ध करत आहेत. 2023 साली दोन्ही बाजूंमध्ये सुरू झालेल्या हिंसक संघर्षानंतर आता शांतता करार दोन्ही देशांसाठी आशेचा किरण ठरला आहे.
आर्मेनियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात सादर करत शांतता कराराबाबत माहिती दिली आहे. आर्मेनियन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ‘शांतता करार स्वाक्षरीसाठी तयार आहे. अर्मेनिया अझरबैजाशी शांतता करारावर स्वाक्षरी करण्यासाठी तयार असून लवकरच तारीख जाहीर केली जाईल. असं त्यांनी म्हंटल आहे.
अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील शांतता करार शेवटच्या टप्प्यात आला असून, लवकरच शांतता करारावर स्वाक्षरी केली जाईल असं म्हंटल आहे.’
परंतु दोन्ही देशांमध्ये हा शांतता करार होणार की नाही हे कोणीच सांगू शकत नाही, कारण अझरबैजानने आर्मेनियाच्या घटनेत बदल करण्याची मागणी केली आहे. आर्मेनियाची राज्यघटना आमच्या भूभागावर दावा करत असल्याचे अझरबैजानने म्हणणे आहे. तर आर्मेनियाने हा दावा फेटाळला आहे. परंतु पंतप्रधान निकोल पेशिनयान यांनी देशाच्या संस्थापक दस्तऐवजाला बदलण्याची गरज असल्याचे म्हणत याकरता जनमत चाचणीचे आवाहन केले आहे, पण त्यांनी याकरता कुठलीही तारीख जाहीर केलेली नाही.
आर्मेनिया आणि अझरबैजान देशांमध्ये काय वाद आहे?
आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात नागोर्नो-काराबाख (Nagorno-Karabakh) प्रदेशावरून वाद आहे, जिथे आर्मेनियाई लोकसंख्या जास्त असून तो प्रदेश अझरबैजानच्या हद्दीत येतो. हा प्रदेश अझरबैजानच्या हद्दीत असला तरी येथे बहुसंख्य आर्मेनियाई लोक राहतात. अशातच आर्मेनिया आणि अझरबैजान दोन्ही या प्रदेशावर आपला हक्क मानतात, ज्यामुळे अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु आहे.