खैबर पख्तुनख्वाच्या दक्षिण वझिरिस्तानमध्ये शुक्रवारी नमाजाच्या वेळी मशिदीत बॉम्बस्फोट करण्यात आला.. गेल्या चार दिवसांत पाकिस्तानमध्ये झालेला हा तिसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १.४५ वाजता मौलाना अब्दुल अजीज मशिदीत स्फोट झाला आहे.
या घटनेत जमियत उलेमा-ए-इस्लाम (JUI) चा जिल्हा प्रमुख अब्दुल्ला नदीम आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, मशिदीत मौलवींसाठी भाषण देण्यासाठी बांधलेल्या स्टेजवर हा स्फोट घडवून आणण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तसेच पोलीस देखील या घटनास्थळी पोहोचले असून या घटनेचे पुरावे गोळा करत आहेत.
जमियत उलेमा-ए-इस्लाम प्रमुखांनी मशिदीतील स्फोटाचा निषेध केला असून पवित्र रमजान महिन्यात मशिदीच्या पावित्र्याचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी पाकिस्तान सरकारला बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामधील परिस्थितीबद्दल देशाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या घटनेची आतापर्यंत कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही.
खैबर पख्तूनख्वामध्ये विशेषत: शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदींना लक्ष्य करण्यात आले आहे. या दिवशी मशिदींमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम नमाज पढण्यासाठी जमतात. तेव्हा हा स्फोट करण्यात आला.
दरम्यान, गेल्या महिन्यात, दारुल उलूम हक्कनिया सेमिनरीमध्ये आत्मघाती स्फोट करण्यात आला. ज्यात जमियत उलेमा-ए-इस्लाम (एस) नेते मौलाना हमीदुल हक हक्कानी यांच्यासह सहा जण ठार झाली होती तर 15 जखमी झाले होते.