Rafale-M Deal: पहलगाम हल्ल्यात धर्म विचारून केवळ हिंदू पुरूषांना टार्गेट केल्याने भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. हा तणाव आता इतका टोकाला गेला आहे की, कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानला चीन आणि तुर्कीने हत्यारे व क्षेपणास्त्र पुरविली असल्याची माहिती समोर आली आहे. आता भारत सरकारनेही एक पाऊल उचलत फ्रान्ससोबत 27 एप्रिल रोजी एका करारावर स्वाक्षरी केली आहे, या करारा अंतर्गत भारतीय नौदलासाठी 26 सागरी लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. विशेष म्हणजे भारत पाकिस्तान यांच्यात यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा करार अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या कराराचे महत्व आपण सविस्तर जाणून घेऊयात
नुकताच झालेला राफेल करार:
भारत ही २६ राफेल विमाने फ्रान्सची संरक्षण कंपनी डसॉल्ट एव्हिएशनकडून खरेदी करणार आहे. ही राफेल विमाने भारताचे सर्वात मोठे युद्ध जहाज असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौकेवर विमाने तैनात केली जाणार आहेत. या 26 लढाऊ विमानांपैकी 22 सिंगल सीटर असणार आहेत, तर चार डबल सीटर असणार आहेत.फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे ६४,००० कोटी रुपयांना झाला असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार मानला जात आहे.
सागरी लढाऊ विमानांची वैशिष्ट्ये काय आहेत:
-खरेतर भारताकडे आधीचे ३६ राफेल हवाई विमाने आहेत. परंतु नवीन राफेल विमानामध्ये डसॉल्ट एव्हिएशन कंपनीने भारताच्या गरजेनुसार अनेक बदल केले आहेत. अर्थातच या सागरी लढाऊ विमानांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान पाहायला मिळेल. जसे की, यामध्ये जहाजविरोधी हल्ला, अण्वस्त्रे डागण्याची क्षमता आणि १० तासांपर्यंत उड्डाण रेकॉर्डिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
-विशेष म्हणजे भारतासोबत करार झालेली फ्रान्स कंपनी भारताला शस्त्र प्रणाली, सुटे भाग आणि विमानांसाठी आवश्यक साधने देखील पुरवणार आहे.
– हे राफेल मरीन ५०.१ फूट लांबीचे असून त्याचे वजन १५ हजार किलोपर्यंत असणार आहे. त्याची इंधन क्षमता ११,२०२ किलो आहे. इंधन क्षमता चांगली असल्याने ते जास्त वेळ उडू शकते. हे एकल आणि दुहेरी आसनी विमान ५२ हजार फूट उंचीवर पोहोचू शकते. या सागरी विमानांचा वेग ताशी २२०५ किमी आहे. हे विमान एका मिनिटांमध्ये १८ हजार मीटर उंची गाठू शकते. या विमानाचे फोल्डिंग पंख देखील खूप मजबूत आहेत.
यापूर्वी झालेला राफेल करार आणि आताचा राफेल करार यात काय फरक:
भारताने फ्रान्सकडून यापूर्वीही हवाई लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. २०१६ मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये हा करार झाला होता. या करारानुसार भारताने फ्रान्सकडून हवाई दलासाठी ३६ राफेल जेट विमाने खरेदी केली होती. २०१६ मध्ये भारत फ्रान्समध्ये हा करार झाल्यानंतर २०२२ ही विमाने भारतात पोहचवली गेली होती. ही विमाने हवाई दलाच्या अंबाला आणि हशिनारा हवाई तळांवरून चालवली जातात. हा करार ५८,००० कोटी रुपयांना झाला. या दोन्ही करारांमध्ये हाच फरक आहे की, २०१६ मध्ये झालेला करारा अंतर्गत भारताने हवाई लढाऊ विमाने खरेदी केली होती. तर आता झालेल्या करारानुसार भारत सागरी लढाऊ विमाने खरेदी करत आहे आणि ही सागरी विमाने हवाई दलाच्या राफेल विमानांपेक्षा अधिक प्रगत असणार आहेत.