Operation Sindoor : २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत हळहळ व्यक्त करत होता. कारण या हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला होता. खरेतर निष्पाप लोकांना लक्ष्य करणे मानवतेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देश एकजुटीने निषेध करत होता, म्हणूनच या दहशतवाद्यांच्या म्होरक्या आवळल्या जाव्यात, अशी प्रत्येक भारतीयाची भावना होती. अखेर भारताने या हल्ल्याचा बदला म्हणून ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे.
खरेतर पाकिस्तान वेळोवेळी बोंबा मारत असतो की, दहशतवादाचा आम्हीही बळी आहोत. पण भारताने काल केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर कारवाई केली असता पाकिस्तानला ते चांगलेच झोंबल्याचे दिसले. कारण पाकिस्तानने भारताने दहशतवाद्यांविरूद्ध केलेल्या कारवाईला पाकिस्तानवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र भारतीय लष्कराने कोणत्याही निष्पाप पाकिस्तानी वस्तीला हानी पोहचवली नाही. तसेच भारताने पाकिस्तानी लष्करांच्या कॅम्पला धक्का देखील लावला नव्हता. भारताने केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्याला लक्ष्य केले होते. मात्र पाकिस्तानलाच युद्ध करण्याची खुमखुमी आल्याचे दिसते आहे. कारण ऑपरेशन सिंदूरनंतर पाकमध्ये युद्धाच्या हालचाली वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर जमवाजमव सुरू झाली आहे. पाकिस्तानकडून युद्धसामग्री आणि रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत. तर, लाहोरमध्ये ‘नोटीस टू एअर मिशन’ जारी करण्यात आले आहे. लाहोरकडे जाणारी-येणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली आहे. त्यासोबतच पाकिस्तानकडून सीमावर्ती भागातली गावेही रिकामी करण्यात आली आहे. खरेतर यानिमित्ताने पाकिस्तान जो आव आणतो की, आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात आहे त्याचा पर्दाफाश झाला आहे. कारण पाकिस्तानच्या कुरापतीता आणखी एक पुरावा आता समोर आला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मृत्यूमुखी पडलेला लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी खालिद मुदस्सीरला पाकिस्तानी सैन्याने काल चक्क ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला आहे. तसेच पाकिस्तान भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांना निष्पाप म्हणत आहे, यावरूनच पाकिस्तानचे भारताबद्दलचे कपट लक्षात येते.
पण खरेतर केवळ ऑपरेशन सिंदूरच नाहीतर आजवर भारताने केलेल्या पाकिस्ताविरोधातल्या कारवाईत भारताने कधीच स्वत:हून निष्पाप लोकांना टार्गेट केले नाही याचे अनेक पुरावे आहेत. १८ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू आणि काश्मीर राज्यातील उरी येथे चार अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करून भारताच्या १ ९ सैनिकांना ठार मारले होते. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यातही भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील केवळ संशयित दहशतवाद्यांना लक्ष्य केले होते. या स्ट्राईकमध्ये दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तसेच तत्कालीन भारतीय लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी स्पष्ट देखील केले होते की, भारताच्या या कारवाईचा उद्देश केवळ दहशतवाद्यांच्या घुसखोरीला आळा घालणे होता.
१४ फेब्रुवारी २०१९रोजी भारतातील जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील, लेथापोरा या अवंतीपोराजवळ असलेल्या ठिकाणी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या एका ताफ्यावर, दुपारी सुमारे ३.१५ वाजता एका आत्मघाती हल्लेखोराने हल्ला केला होता. ताफ्यातील केंद्रीय राखीव बलातील सुमारे ४० निष्पाप सैनिकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाच्या कथित प्रशिक्षण शिबिरावर भारतीय युद्ध विमानांनी केलेला बॉम्ब हल्ला केला होता. भारताने बालोकटवर केलेली कारवाई दहशतवादी प्रशिक्षण शिबिरावर निर्देशित केलेला पूर्वसूचक हल्ला असल्याचे स्पष्ट केले होते, त्यातही केवळ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
एकंदरित आजवर भारताने कधीही पाकिस्तानातील निष्पाप लोकांना लक्ष्य केले नाही. भारत नेहमीच शांतता आणि नीतिमत्तेसाठी उभा राहिला देश आहे. म्हणूनच आजवर अनेक देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. उलट पाकिस्तान खतपाणी देत असलेल्या दहशतवादी संघटनाच भारतातील निष्पाप लोकांचा सातत्याने बळी घेत आल्या आहेत.