जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, पाकिस्तानने राजस्थानमधील भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री पाकिस्तानने राज्यातील पाच लष्करी तळांना लक्ष्य केले. हा हल्ला १९७१ नंतर राजस्थानमध्ये पाकिस्तानने केलेला सर्वात मोठा लष्करी हल्ला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा हल्ला पूर्णपणे हाणून पाडला.
राजस्थानमध्ये पाकिस्तानने कुठे-कुठे हल्ला केला ?
राजस्थानमधील जैसलमेर आणि पोखरण भागात गुरुवारी रात्री पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली. पाकिस्तानने जैसलमेर हवाई दल आणि लष्करी तळांवर हल्ले केले, जे भारताच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीने हाणून पाडले.
याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हवाई हल्ल्यासोबतच पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार गोळीबार करण्यात आला, ज्याला देखील भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले.
राजस्थानमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचे हवाई हल्ले कसे रोखले ?
पाकिस्तानकडून अशाप्रक्रारे हल्ला करण्यात येणार याची भारताला आधीच कल्पना होती. आणि याच पार्श्वभूमीवर भारताने संभाव्य मार्गांवर आधीच सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. भारताकडून सीमेवर S-400 सुदर्शन चक्र तैनात करण्यात आले होते. भारताच्या S-400 सुदर्शन चक्राने भारताच्या दिशेने येणारे सगळे धोके ओळखत पाकिस्तानकडून येणारे सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. ‘जर भारताने S-400 प्रणाली तैनात नसती, तर पाकिस्तान कडून होणार हल्ले राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी विनाशक ठरले असते.’ असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
S-400 : ‘सुदर्शन चक्र’ काय आहे?
S-400 ट्रायंफ ही रशियाच्या अल्माज-एंटे या संस्थेने विकसित केलेली एक अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली आहे. भारताने 2018 मध्ये रशियाकडून सुमारे 35,000 कोटी रुपयांच्या करारात 5 युनिट्स खरेदी केल्या आहेत. आतापर्यंत भारतात यातील 3 युनिट्स पूर्णपणे सक्रिय आहेत.
कसे काम करते S-400
S-400 सिस्टीममध्ये प्रगत रडार यंत्रणा, कमांड सेंटर, लॉन्च व्हेईकल्स आणि मिसाईल युनिट्स असतात. हे सर्व घटक समन्वयाने काम करतात. सर्वप्रथम, रडार प्रणाली संभाव्य हवाई धोक्यांची माहिती गोळा करते. त्यानंतर कमांड सेंटर ती माहिती विश्लेषित करून योग्य मिसाईल लॉन्च करण्याचा निर्णय घेते. काही सेकंदांतच शत्रूच्या लक्ष्यांवर अचूक आणि वेगवान प्रतिउत्तर दिले जाते.
राजस्थानच्या लोकांची प्रतिक्रिया
पाकिस्तानच्या कुरापत्यांना भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आल्यानंतर आता राजस्थानमधील स्थानिकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
प्रतिक्रिया १
https://x.com/ANI/status/1920668527994061307
जैसलमेरमधील एका व्यक्तीने पाकिस्तानकडून सुरु असलेल्या हल्ल्यांविषयी माहिती देत सांगितले की, ‘पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात आले. पण वायू सेनेने एकही ड्रोन जमिनीवर आदळू दिला नाही. सगळे ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. भारतीय सैन्याचा हा डिफेन्स पाहून खूप छान वाटले, भारताने दाखवून दिले आहे की, पाकिस्तान समोर भारताची ताकत खूप मोठी आहे आणि पाकिस्तान कधीही भारतासमोर जिंकू शकत नाही. जेव्हा पाकिस्ताने हल्ले सुरु केले तेव्हा भीती वाटत होती, पण काही वेळात जेव्हा बातम्या पहिल्या तेव्हा समजले भारताच्या वायू सेनेने सर्व ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत. तेव्हा स्थिती स्थिर झाली.
प्रतिक्रिया २
https://x.com/ANI/status/1920669444231360888
आणखी एका व्यक्तीने प्रतिक्रिया देताना सांगितले की, जेव्हा रात्री पाकिस्ताने हल्ला केला तेव्हा भीतीचे वातावरण होते. जसे-जसे पाकीस्तानमधून ड्रोन येत होते भारतीय वायू सेना ते हवेतच नष्ट करत होती. पाकिस्तानने जेवढे हल्ले केले ते सगळे हल्ले भारतीय हवाई दलाकडून हाणून पाडण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कमी झाले. रात्री तणावाचे वातावरण होते. पण सकाळी पुन्हा सगळं नीट झालं आणि लोक बाहेर फिरायला लागले, हे भारतीय सेनेचे कौतुक आहे. आम्ही भारतीय सेने सोबत आहोत…पाकिस्तानला दाखवून देऊ…’ अशा अनेक प्रतिक्रिया राजस्थानमधून समोर येत आहेत.
एकदंरीतच स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया पाहता तिथली आधीची आणि आताची परिस्थिती पूर्णतः वेगळी दिसून येते. सकारात्मक बाब म्हणजे भारतीय सेनेच्या कारवाईनंतर इथली स्थिती सुरळीत झाली आहे. खरं तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अधिक सतर्क राहून दशतवादाविरुद्ध कारवाई करत आला आहे. त्याचेच सकरात्मक परिणाम राजस्थानमध्ये पाहायला मिळत आहेत.