भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर जगाला माहिती दिली, तेव्हा कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला सशस्त्र दल अधिकाऱ्यांपैकी एक होत्या ज्यांनी ऑपरेशनल सिंदूरचा संकल्प, केलेली कारवाई, सैन्याचा आत्मविश्वास आणि भारतीय एकतेच मजबूत संदेश दिला.
सोफिया गुजरातमधील बडोद्याच्या रहिवासी त्यांनी बायोकेमेस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. सोफिया यांचे आजोबा भारतीय सैन्यात होते. त्यांचे पती ताजुद्दिन कुरेशी मेकनाईज्ड इन्फंट्रीचे अधिकारी आहेत.
1999 मध्ये सोफिया कुरैशी वयाच्या 17 व्या वर्षी शॉर्ट सर्व्हिस कमिशन चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून भारतीय लष्करात प्रवेश केला. बहुराष्ट्रीय ‘एक्सरसाईज फोर्स 18’ प्रोग्रॅमचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी. सहा वर्षे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेमध्ये देखील काम केलं आहे.
2006 मध्ये कांगोत संयुक्त राष्ट्रांच्या शांती अभियानात सहभागी. 2010 पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित, शांती मोहिमेमध्ये प्रशिक्षणासंबंधित योगदान देण्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली होती.
पुण्यात झालेल्या फील्ड ट्रेनिंग सरावात सहभागी झालेल्या १७ देशांमधील तुकड्यांमध्ये त्या एकमेव महिला प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी ४० सदस्यांच्या भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते.
पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांच्या सेवेबद्दल जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांच्याकडून प्रशंसापत्र. दक्षिण कमांडचे तत्कालीन आर्मी कमांडर दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी एकदा म्हटले होते की, “सोफिया यांची निवड त्यांच्या क्षमता आणि नेतृत्वगुणांवर आधारित आहे , त्यांच्या महिला असल्यामुळे नाही.”
२०१६ च्या बहुराष्ट्रीय सरावाच्या समारोप समारंभात, जेव्हा सोफिया यांना विचारण्यात आले की त्यांना तुकडीचे नेतृत्व करण्याबद्दल कसे वाटते, तेव्हा बोलताना त्या म्हणाल्या , “अर्थातच मला अभिमान वाटतो.” आणि सशस्त्र दलातील इतर तरुणींना त्यांचा संदेश होता, “देशासाठी कठोर परिश्रम करा आणि सर्वांना अभिमान वाटावा असे काम करा. देशातील अनेक तरुणींनी भारतीय सेनेत सामील व्हाव.”
पाकिस्तानला पाणी पाजणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या सामान्य योद्ध्या नाहीत. तर त्यांचे देशाच्या महान क्रांतिकारी राणी लक्ष्मीबाई यांच्याशीही नाते आहे. सोफिया कुरेशी यांनीच काही वर्षांपूर्वी याबाबत माहिती दिली होती. सोफिया कुरेशी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “माझे वडील आणि माझे आजोबा सैन्यात होते आणि माझी पणजी राणी लक्ष्मीबाईंसोबत होती. ती एक योद्धा होती.’असे कर्नल सोफिया म्हणाल्या.
देशाला हेवा वाटावा असं कार्य करणाऱ्या अनेक सोफियांची सध्या गरज आहे, खोटा स्त्रीवाद आणि बेडगी स्त्री सक्षमीकरणाची टिमकी मिरवणाऱ्यानी यातून योग्य बोध घ्यावा.