“शब्दांपेक्षा कृती मोठी असते.” हे वाक्य भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर शाब्दिक नव्हे तर तिहेरी कृतीतून सिद्ध केले आहे. २५ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने भारतीय जनतेचा संयम संपला होता,दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भ्याड हल्ल्याची चीड भारतीयांच्या मनात गेली कित्येक दिवस घर करून होती. दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अस्वस्थता होती. सरकारच्या पातळीवरही यावेळी केवळ निषेध पुरेसा नव्हता. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल हे आधीच स्पष्ट केले होते. पण कधी आणि केव्हा हे मात्र निश्चित नव्हते. पण त्या नंतर भारताने पाकिस्तानची जी काही कोंडी करायला सुरुवात केली. त्यावरून हे स्पष्ट होतं की भारत आता जागतिक राजकारणात एक जबाबदार पण ठाम राष्ट्र म्हणून उभा राहत आहे. खरतर पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अधिक कठोर भुमिका घ्यायला सुरुवात केली. यामध्ये जमिन हवा आणि पाणी या तिन्ही आघाड्यांवर पाकिस्तानला दणका द्यायला सुरुवात केली. या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानची कशी धुळधाण केली तेच आपण जाणून घेणार आहोत.
१. हवाई कारवाई,
७ मे २०२५ रोजी भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाब प्रांतातील ९ ठिकाणांवर अचूक हवाई हल्ले सुरु केले जे आजही सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये राफेल विमानांनी SCALP क्षेपणास्त्र आणि AASM Hammer बॉम्बांचा वापर केला. ज्यामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ हवाई कारवाई नाही तर ते एक भावनिक आणि सामरिक समर्पण आहे. भारतीय महिलांवर, पर्यटकांवर, आणि शांततेच्या हक्कावर झालेल्या हल्ल्याचे उत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली. पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसून भारताने १९७१ नंतर प्रथमच इतका खोलवर आघात केला.
या कारवाईमागील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे S-400 अर्थात भारताचे सुदर्शन चक्र भारताच्या सशस्त्र दलांनी नुकत्याच पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा यशस्वीरित्या सामना केला. पाकिस्तानने अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, भुज यासारख्या ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला केला होता. मात्र, भारताच्या S-400 प्रणालीने या सर्व हल्ल्यांना तात्काळ निष्क्रिय केले आणि पाकिस्तानचा कुटील डाव उधळून लावला रशियाकडून प्राप्त केलेली ही प्रणाली आता भारताच्या आकाशाची रक्षक बनली आहे.चीनकडून पाकिस्तानला मिळालेली HQ-9 प्रणाली या कारवाईसमोर निष्प्रभ ठरली. भारताची हवाई ताकद आता केवळ संरक्षणापुरती मर्यादित नाही, तर आक्रमक प्रतिउत्तरातही सक्षम आहे.
२. सीमाभागातील कारवाई
दहशतवाद केवळ बॉम्ब आणि बंदुकांतूनच घुसत नाही; तर तो सीमारेषांमधूनही चुपचाप घुसखोरी करत जातो. पण बीएसएफ आणि भारतीय लष्कराने यावेळी ही घुसखोरी करणारी छाया जिवंतपणे पकडली आणि जम्मू-काश्मीरमधील सांबा भागात ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या सात दहशतवाद्यांचा संबंध जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानप्रेरित संघटनेशी असल्याचा संशय आहे, जो भारतासाठी नवीन नाही. पण यावेळी भारताची सज्जता आणि कारवाईची गती लक्षवेधी होती.त्याआधी सीमेवर पाकिस्ताने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या 10 जवानांना ठार केले आहे. पाकिस्तानच्या अशा सर्व प्रकारच्या कारवायांना भारतीय सैन्य सतत निष्प्रभ करत आले आहे.
३. जल कारवाई
पाकिस्तानने पहलगाममध्ये पर्यटकांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करणे. भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्याचा परिणाम पाकिस्तानवर दिसू आला. सिंधू पाणी करार रद्द केल्याच्या काही दिवसांतच रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये पाण्याचे संकट वाढत चाललेले दिसून आले. ज्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसला. हे निर्णय केवळ जलनीतीचे नव्हे, तर सामरिक दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचे आहेत. आता नुकतच भारताने पूर्वसूचना न देता चिनाब नदीचे पाणी पाकिस्तानात सोडल्याने, इस्लामाबादपासून रावळपिंडीपर्यंत पूरसदृश स्थिती निर्माण झाली. या कृतीचा मुख्य संदेश असा होता की पाकिस्तान आता भारताच्या धोरणांवर अवलंबून आहे.
तिकडे सागरी कारवाईच्या माध्यमातून भारतीय नेव्ही आपली जबाबदारी चोख बजावताना दिसत आहे. भारत-पाक तणावादरम्यान भारतीय नौदलाने अरब सागरात युद्धनौकांची घेराबंदी केली. INS विक्रमादित्य, INS चेन्नई, आणि अन्य युद्धनौकांनी कराची बंदराला लक्ष्य करत सागरी टेहळणी आणि दहशतवादी पुरवठा रेषा अडवण्याचे कार्य केले. पाकिस्तानच्या Gwadar पोर्टजवळ नौदलाने घातलेली नाकेबंदी ही एक धोरणात्मक खेळी ठरली. या सागरी कारवाईमुळे पाकिस्तानला चीनकडून होणाऱ्या सागरी पुरवठ्यावर तात्पुरता का होईना पण अडथळा निर्माण झाला.
खरतर पाकिस्तान आता दोन्ही बाजूंनी अडकला आहे एकीकडे आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक संकट, आणि दुसरीकडे भारताकडून येणारा रणनीतिक ताण. भारताने तिहेरी स्तरांवर कारवाई करून पाकिस्तानसमोरील पर्याय खुंटवले आहेत. ना ते हवाईदल्ल्याला उत्तर देऊ शकले, ना जमीन कारवाई रोखू शकले आणि ना भारताच्या जलनीतीला तोंड देऊ शकले. भारताने यावेळी फक्त सूड घेतलेला नाही, तर दहशतवादाविरोधातली आपली सुरक्षा संकल्पना नव्याने मांडली आहे. हवाई, जमीन आणि जलमार्गांचा संगम करून, या तिहेरी शक्तीच्या माध्यमातून भारताने जगाला एक ठोस संदेश दिला आहे. की “दहशतवाद सहन केला जाणार नाही, आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांना शांत झोप कधीच मिळणार नाही.”