२४ मे रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कारवाईबाबत सर्वपक्षीय बैठक घेतली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे या बैठकीला उपस्थित होते यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबाही दिला. पण यानंतर जे घडले, ते पाहता काँग्रेस पक्ष एकत्र आहे का? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. या पक्षात एकाच मुद्द्यावर अनेक विरोधी भूमिका मांडल्या जात आहेत, आणि त्यामुळेच काँग्रेसची विश्वासार्हता सातत्याने डळमळीत होताना दिसते. पक्ष एक निर्णय घेतो, पण त्याचे काही नेते माध्यमांसमोर जाऊन वेगळीच मते मांडतात त्यामुळे ही बाब विरोधकांसाठी हत्यार तर काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून ते भारताने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरापर्यंत काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यातून कसे वाद निर्माण झाले तेच आपण जाणून घेणार आहोत.
अजय राय – राफेलवर लिंबू-मिरची?
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांचा एक व्हिडिओ एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राय यांच्या हातात राफेल विमानाची प्रतिकृती असून त्याला प्रतिकात्मक ‘लिंबू-मिरची’ लटकवण्यात आली असल्याचे दिसून आले.यामध्ये बोलताना ते म्हणाले की लढाऊ विमानावरून ‘लिंबू-मिरची’ कधी काढली जाईल, त्यांच्या याच व्हिडिओवरून वाद निर्माण झाला.आता हे एक विनोदी विधान म्हणावं का शाब्दिक विनाश? देशाच्या सुरक्षेशी निगडीत विषयांवर असे हलक्याफुलक्या शैलीत वक्तव्य करणे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला शोभते का? हाच खरा प्रश्न आहे. विनोदाच्या नावाखाली जबाबदारी टाळणे ही लोकशाही नसून लोकांची दिशाभूल आहे.
#WATCH | Delhi: BJP MP Sambit Patra says "…From outside, they are the Congress Working Committee (CWC) but from inside, they are PWC (Pakistan Working Committee)…CWC meeting was held yesterday, and some proposals were passed. Right after that, a press conference was held, and… https://t.co/DabrGkHht5 pic.twitter.com/BxTkFLOTpU
— ANI (@ANI) May 3, 2025
विजय वडेट्टीवार – दहशतवाद्यांना धर्म नसतो?
पहलगाम हल्ल्यात हिंदू पर्यटकांना जाणून बुजून लक्ष्य केले गेले त्यामुळे जगभरातून यावर रोष व्यक्त असताना महाराष्ट्रातील काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त विधान केले. दशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केली हा दावा चुकीचा असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे आहे की, कोणाच्या कानात जाऊन तुमचा धर्म कोणता आहे? असे विचारतील. दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो. असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते. आता हा दावा ऐकायला तर भावनिक आणि सार्वत्रिक वाटतो, पण जेव्हा हल्ल्याचा उद्देश धर्माधारित असल्याचे स्पष्ट होते तेव्हा असे विधान करताना जबाबदारीची गरज असते. दहशतवाद फक्त गोळ्या झाडत नाही, तो विचारही झाडतो आणि तो विचार धर्माधारित असेल, तर त्यावर गंभीरपणे पाहण्याची गरज आहे.
#WATCH | Nagpur, Maharashtra | Congress MLA Vijay Wadettiwar says, "The government should take responsibility for the #PahalgamTerroristAttack. They (the government) are saying that terrorists killed people after asking them (about their religion). Do terrorists have time for all… pic.twitter.com/88ic7AM5gf
— ANI (@ANI) April 28, 2025
पृथ्वीराज चव्हाण – ‘ऑपरेशन सिंदूर’चा रंग राजकारणाचा?
दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय सेनेने केलेल्या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले गेले. पण राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हे नाव राजकीय वाटले. सरकारने ‘भावनिक फायदे’ मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव निवडले होते, असे ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधी केलेल्या लष्करी कारवाईबद्दल सैन्याचे अभिनंदन केले. परंतु ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव निवडले असले तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम होणार नाही. मतपेढीला खुश करण्यासाठी विधवांच्या भावनांचा आधार घेतला जात असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला असून काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दिसून आले. कारण काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी सध्या यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे म्हटलंय. तसेच या घडीला सरकार घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाला आमचा पूर्ण पाठिबा आहे. आम्ही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे ते म्हणाले आहेत.
चरणजीत चन्नी – पुन्हा सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह
पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राईकवर थेट प्रश्नचिन्ह उभे केले. “किती लोक मारले गेले? कोणत्या ठिकाणी कारवाई झाली?” असे प्रश्न विचारुन त्यांनी वाद ओढवून घेतला. आता हा मुद्दा त्यांनी पारदर्शकतेच्या दृष्टीनेही विचारला असेल, पण भारताच्या सैन्याच्या क्षमतेवर खुलेआम संशय घेणे हे पाकिस्तानला मुद्दाम संधी देण्यासारखे आहे. आजवर ज्या वेळेस सर्जिकल स्ट्राईकबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्या वेळेस पाकिस्तानने त्याचा फायदा उचलून भारतविरोधी प्रचार केला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.
अस्लम शेख – याकुब मेमनच्या बाजूने?
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनला फाशी नको, असा आग्रह काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी एका पत्राद्वारे धरला होता. हा मुद्दा जुनाट असला, तरी आजच्या संदर्भातही महत्त्वाचा आहे. कारण काँग्रेसचा एक गट असा दिसतो, जो कायम राष्ट्रहिताच्या विरोधात भूमिका घेतो आणि स्वतःच्याच पक्षाच्या राष्ट्रवादी भूमिकेला कमजोर करतो.
आता काँग्रेसमध्ये लोकशाही आहे हे मान्य. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे हेही मान्य. पण, पक्षाच्या अधिकृत भूमिकेला विरोध करणारी विधाने वारंवार समोर येणे हे काॅंग्रेससाठी नक्कीच हिताचे नाही. बरं त्यांच्या अशा विधानांमुळे ते विरोधकांच्या हातात आयतं कोलीत देतात. यामुळे काँग्रेसचे नेते स्वतःची आणि पर्यायाने जनतेचेही फसवणूक करत आहेत. जर का एकाच पक्षात इतक्या विरोधाभासी भूमिका असतील जनतेला कोणावर विश्वास ठेवायचा? खरतर काँग्रेसने आता स्वतःलाच विचारायला हवं की आम्ही पक्ष आहोत की मुक्त व्यासपीठ? कारण सध्या तरी, काँग्रेसच्या विचारांचा आवाज स्पष्ट नाही, आणि ज्या पक्षाचा विचारांचा आवाज अस्पष्ट असतो त्या पक्षाकडे मतदार पाठ फिरवतात हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. वस्तुतः कोणतीही राजकीय संघटना केवळ नेतृत्वावर नव्हे, तर संपूर्ण कार्यसंघाच्या सुसंगत विचारांवर उभी राहते. त्यामुळे काँग्रेससाठी आता ‘एक आवाज, एक भूमिका’ ही गोष्ट तातडीने साध्य करणे अत्यावश्यक झाले आहे.