India VS Pakistan:पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध चांगलेच चिघळले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीर येथे एकूण 9 हवाई हल्ले केले होते, यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले होते. मात्र त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमाभागातील राज्यांवर हल्ले करण्यास सुरवात केली आहे. पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, उधमपूर यासह भारतीय लष्कराच्या तळांवर ड्रोन तसेच मिसाईल्सच्या माध्यमातून हल्ले केले. मात्र भारतीय सैन्य हे सर्व हल्ले परतवून लावत आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली आहे हे स्पष्ट होते. हे युद्ध कशामुळे सुरू झाले आहे तर दहशतवाद्यी हल्ले रोखण्यासाठी भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेल्या हल्ल्यामुळे. एकीकडे भारत दहशवादाचा खात्मा करण्यासाठी प्रयत्न करतोय तर पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतोय. अर्थातच आज भारत जो लढा देतोय तो दहशवादाचा खात्मा करण्यासाठी.
विशेष म्हणजे याच दिवशी पण हजारो वर्षांपूर्वी भारताचा असाच एक महत्वपूर्ण लढा देत होता. पण तो लढा स्वातंत्र्यासाठी होता. अर्थातच १० मे १८५७ रोजी उठाव सुरू झाला होता. १८५७ चा उठाव, ज्याला भारतीय बंड किंवा पहिले स्वातंत्र्ययुद्ध देखील म्हणले जाते. हा उठाव भारतीय सैनिकांच्या बंडाने सुरू झाला होता, मात्र नंतर हा उठाव सामान्य जनतेमध्ये पसरला होता. तसेच उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी व्यापक झाला होता. जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व त्यानंतर तब्बल ९० वर्षानंतर म्हणजेच १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.
-1857 च्या उठावामुळे भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश राजवटीविरोधी भावना वाढली होती, यामुळेच पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अधिक जोर प्राप्त झाला.
– अर्थातच 1857 चा उठाव हा भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा ठरला होता. या उठावामुळे भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत मोठे बदल झाले होते. हा उठाव जरी अपयशी ठरला, तरी या उठावाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला चालना दिली होती.
सध्या असाच लढा भारताचा दहशतवादविरोधात सुरू आहे. खरेतर भारतावर स्वतंत्र झाल्यापासूनच जवळपास भारतावर सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. परंतु गेल्या दशकात काश्मिर वगळता भारतात अन्य कोणत्याही ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला नाही हे आपल्या सुरक्षा यंत्रणाचे, गुप्तचर संघटनांचे आणि सरकारचे मोठे यश आहे. परंतु भारत पुर्णपणे दहशतवादमुक्त आहे असे म्हणता येत नाही. विशेष म्हणजे जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२५ नुसार दहशतवादाचा धोका अधिक वाढला आहे. दहशतावादग्रस्त देशांची संख्या ६६ झाली आहे. यापूर्वी ५८ होती. खरेतर अलीकडच्या काळात दहशतवादी पारंपारिक शस्त्रांपेक्षा डिजीटल साधनांचा हल्ल्यासाठी वापर करताना दिसत आहे. त्यामुळे आता भारतासह अनेक देशांसमोर दहशतवाद रोखणे हे मोठे आव्हान बनले आहे.
खरेतर भारताने दहशतवादाला आळा घालण्यासाठी अनेक महत्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. भारताकडून सीमेची सुरक्षा वाढवून, घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. तसेच भारताने गुप्तचर यंत्रणा मजबूत करून, दहशतवादी कारवायांची माहिती मिळवण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. विशेष म्हणजे भारताने 2002 मध्ये दहशतवाद प्रतिबंध कायदा आणला आहे, जो दहशतवादाला रोखण्यासाठी मदत करतो. तसेच भारतावर दहशतवादी हल्ले झाल्यानंतर भारताने अनेकदा पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे नष्ट केले आहेत.
परंतु पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने जी भूमिका घेतली आहे ती भारताने याआधी घेतलेल्या भूमिकेपेक्षा अधिक आक्रमक दिसत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला हादरवून सोडणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. काहीही झाले तरी दहशतवाद्यांना सोडणार नाही, यासाठी भारत आणि भारत सरकार पेटून उठल्याचे दिसत आहे. भारताच्या या भूमिकेमुळे दहशतवाद पूर्ण नष्ट होईलच असे नाही, परंतु १८५७ च्या उठावामुळे ज्या प्रमाणे लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि पुढे जाऊन ब्रिटीशांविरूद्ध मोठा लढा उभा राहिला, त्याच प्रमाणे दहशतवादाविरूद्धचा भारताचा यावेळेसचा हा लढा नक्कीच दहशतवाद्यांना घाम फोडणारा आणि इतिहासात नोंद घेण्यासारखा आहे. त्यामुळे भारताने घेतलेली ही भूमिका दहशतवाद्यांमध्ये नक्कीच वचक बसविणारी आहे.