भारत आणि पाकिस्तानमध्ये आज, शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपासून युद्धबंदी लागू झाली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून जल, जमीन आणि आकाशात युद्धबंदीवर सहमती झाल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.मात्र युद्ध थांबले एवढाच खुलासा भारतीय सैन्य दलांनी आज पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. भारतीय सैन्य दलाच्या प्रतिनिधींनी शस्त्रसंधी अर्थात ceasefire हा शब्द वापरलेला नाही.
https://x.com/AHindinews/status/1921184586232455240
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गोळीबार आणि सैन्य दलाच्या कारवायांना थांबविण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविण्यात आली आहे. पण, भारताने सर्वच ताकदीनीशी दहशतवादाविरुद्ध आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केली आहे .आता जरी सैन्य कारवाया थांबल्या पण दहशतवादाविरुद्धची हीच भूमिका यापुढे देखील कायम राहिल” असे ट्विट परराष्ट्रमंत्र्यांनी केले आहे.
यासंदर्भात परराष्ट्र सचिव म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल ऑफ मिल्ट्री ऑपरेशन (डीजीएमओ) सोमवारी 12 मे रोजी पुन्हा याबाबत चर्चा करतील. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याबाबत ट्विट करत सांगितले होते की भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमत झाले आहेत. तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, “गेल्या 48 तासांत, जेडी व्हान्स आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि असीम मलिक यांच्यासह वरिष्ठ भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी बोललो आहोत. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी तात्काळ युद्धबंदी करण्यास आणि तटस्थ ठिकाणी विविध मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.