India Pakistan War: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अखंड भारत हळहळ व्यक्त करत होता. पहलगाम हल्ल्यात केवळ हिंदू पुरूषांना टार्गेट केल्याने भारतीय नागरिक आणि भारत सरकार पेटून उठले होते. त्यानंतर भारत सरकारने दहशतवादाला खतपाणी देणाऱ्या पाकिस्तानविरोधात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आणि त्यानंतर भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूरला’ सुरवात झाली. अर्थातच पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत भारत पाकिस्तानमध्ये अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण आजच्या या लेखातून घेऊयात.
-22 एप्रिल 2025 जम्मू काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला, या हल्ल्यात 26 निरपराध मारले गेले. या हल्ल्यात 26 लोक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने स्विकारली होती.
-२३ एप्रिलला भारताने पाकिस्तानविरूद्ध अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली. तसेच पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आणि जे पाकिस्तानी नागरिक भारतात आहेत त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले.
-२४ एप्रिल रोजी केंद्र सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या सर्वपक्षीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले होते. या बैठकीनंतर बैठकीच्या शेवटी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकारांना माहिती दिली होती की, दहशतवादाविरुद्ध देशाने एकमुखाने बोलले पाहिजे यावर सर्व पक्षांचे एकमत आहे. अर्थातच सर्व पक्षांनी दहशतवादाविरूद्ध भारत सरकार जी भूमिका घेईल त्याला पाठिंबा जाहीर केला.
-२४ एप्रिल रोजीच पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले की, सिंधू जल कराराला स्थगिती देण्यासारखे जे भारताचे निर्णय आहेत, अशा कोणत्याही प्रयत्नांना पाकिस्तान ‘युद्धाची कृती’ म्हणून पाहत आहे.
-२५ एप्रिल रोजी दोन्ही देशाच्या नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार झाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या चौक्यांवर लहान शस्त्रे आणि तोफांचा वापर करण्यात आला होता. ज्यामुळे सीमेवर आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
-२६ एप्रिलला भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. २६ एप्रिलला भारताने जम्मू-काश्मीरमधील उरी धरणातून झेलम नदीत पाणी सोडले. या कृतीमुळे पाकिस्तानच्या मुजफ्फराबाद भागात पूरस्थिती निर्माण झाली होती आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. तसेच २६ एप्रिलला अमेरिकेकडून भारत पाकिस्तानला सल्ला देण्यात आला की, दोन्ही देशांनी हा वाद आपसात मिटवावा.
-२७ एप्रिल रोजी भारतीय नौदलाने दीर्घ पल्ल्याच्या अचूक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. अर्थातच भारतीय लष्कराने युद्धसरावाला सुरवात केली. याच दिवशी पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी म्हटले होते की, भारताकडून होणाऱ्या हल्ल्यासाठी पाकिस्तान तयार आहे.
-२८ एप्रिल रोजी भारताने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या चॅनेलमध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, राफ्तार, जिओ न्यूज, सुनो न्यूज, द पाकिस्तान एक्सपिरियन्स, शोएब अख्तर आणि इतर प्रमुख चॅनेल समावेश आहे. या चॅनेलवरती भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांविरुद्ध भडकाऊ आणि चुकीची माहिती प्रसारित होत होती, असा स्पष्टीकरण भारताकडून करण्यात आले.
-२९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडली. मोदींनी तिन्ही सैन्य दलाला पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जी काही कारवाई करायची आहे, त्यासाठी सैन्य दलाला पूर्ण मोकळीक आणि स्वातंत्र्य असेल, असे जाहीर केले होते. याच दिवशी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी २९ एप्रिल रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. या चर्चांमध्ये त्यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.
– ३० एप्रिल रोजी दोन देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने ३० एप्रिल रोजी पाकिस्तानी विमान कंपन्यांना आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. अर्थातच भारताने पाकिस्तानसाठी हवाई हद्द बंद केली.
– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठका पाहून भारत काहीतरी मोठा निर्णय घेणार याची चाहूल पाकिस्तानला लागली. त्यामुळे १ मे रोजी पाकिस्ताननेही हालचाली सुरू करत सीमेवर चीनकडून घेतलेल्या तोफा तैनात केल्या. तसेच पाकिस्तानने सीमेवर झेंडे पुन्हा लावले.
– २ मे रोजी नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूंकडून लहान शस्त्रे आणि तोफांचा वापर सुरूच होता, ज्यामुळे तणाव कायम होता. तसेच दोन्ही देशांनी आपापल्या संरक्षण सिद्धतेचा आढावा घेतला आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले होते.
-३ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आखाती देशांच्या राजदूतांची भेट घेतली आणि भारतासोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांकडे मदत मागितली. याच दिवशी राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफने एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले होते.
-४ मे रोजी भारताने पाकिस्तानविरोधात आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत चिनाब नदीवरील बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखला. याच दिवशी रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी भारताला धमकी दिली की, जर भारताने कोणतीही कारवाई केली, तर पाकिस्तान त्यांच्यावर अणुबॉम्ब हल्ला करेल.
-५ मे रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलाने स्वदेशी विकसित केलेल्या मल्टी-इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची पडताळणी चाचणी यशस्वीरित्या पार पडली.
-६ मेला पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून भारत काहीतरी कारवाई करेल याची भिती व्यक्त करण्यात आली होती.
-७ मे रोजी भारताने ऑपरेश सिंदूर राबवत पाक व्याप्त काश्मिरमध्ये घुसून ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ऑपरेश सिंदूरमुळे संपूर्ण भारतात आनंद व्यक्त करण्यात आला.
-ऑपरेशन सिंदूरमुळे मिरची लागलेल्या पाकिस्तानने ८ मे रोजी भारताच्या १५ शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर अशा काही शहरांवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला करण्याच प्रयत्न केला. परंतु भारताच्या एस-४०० या बचाव प्रणालीने सर्व हल्ले परतून लावले. पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केलेल्या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आले होते. तसेच भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली होती. पाकिस्तानच्या या कुरघोडीनंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली.
-९ मे रोजी भारताकडून पाकिस्तानचे ७ अतिरेकी मारण्यात आले. पाकिस्तानने भारतावर ४०० ड्रोन हल्ले केले आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य केले, यामध्ये भारतातील नागरिकांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते.
-१० मे रोजी अमेरिकेने भारत पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केली आणि ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान यांच्या शस्त्रसंधी लागू झाल्याचे जाहीर केले, त्यानंतर भारताकडूनही शस्त्रसंधी लागू करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर भारतीय सैन्याने १० मेला सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण कारवाईबाबत माहिती दिली. या पत्रकार परिषदेत भारतीय सैनिकांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तानला इतके मोठे नुकसान पोहोचवले की त्यांच्या हल्ल्याची क्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. भारतीय सैन्याने सांगितले की, आमच्या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानी सैन्याला प्रचंड नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या जमिनीवरील आणि हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या स्कर्दू, जकोबाबाद, सरगोधा आणि भुलारी यासह हवाई तळांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवले आहे. तसेच पाकिस्तानच्या हवाई संरक्षण आणि रडार प्रणाली पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या युद्धात पाकिस्तानेच मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.
परंतु शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर काही तासातच शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानी सेनेने जम्मू, राजस्थान, पंजाब या सीमाभागातील राज्यांवर हवाई हल्ले केले होते.
-या सर्व घडामोडीनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका स्पष्ट केली होती. शस्रसंधीचे उल्लंघन करणे ही अतिशय निंदनीय आणि गंभीर गोष्ट आहे. पाकिस्तानने ही गोष्ट गंभीरपणे घ्यावी आणि योग्य ती कार्यवाही करून सीमेपलीकडून होणारा गोळीबार थांबवावा, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पाकिस्तानला सुनावले होते. तसेच शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा सामना करण्यासाठी ठोस आणि कठोर पाऊल उचलण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले होते.