भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामानंतर काँग्रेस पक्षाने आपली पारंपरिक शैली कायम ठेवत पुन्हा एकदा इंदिरा गांधींच्या 1971 च्या युद्धातील नेतृत्त्वाचा हवाला देत सत्ताधारी सरकारवर टीका केली. इंदिरा गांधी यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी कमकुवत आहेत, असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. म्हणजे काॅंग्रेस नेते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तुलना करताना दिसत आहेत. दुसरीकडे मीडियावरही इंदिरा गांधींचा ट्रेंड सुरु झाला आहे. “अमेरिका डोळ्यात डोळा घालून धमकावत होती, पण इंदिरा गांधी झुकल्या नाहीत. पाकिस्तानचे दोन तुकडे करून त्यांनी इतिहास घडवला.” हे वाक्य सध्या काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टपासून ते त्यांच्या नेत्यांच्या भाषणांपर्यंत वारंवार ऐकू येतं. 1971 च्या युद्धात इंदिरा गांधींनी दाखवलेल्या नेतृत्त्वाचे कौतुक आजही होत आहे, आणि ते होणेही अपेक्षित आहे पण प्रश्न आहे, काँग्रेस पक्ष या गौरवशाली आठवणींवर किती काळ जगणार? आजच्या काँग्रेसकडे ना इंदिरा गांधींसारखं स्पष्ट आणि धाडसी नेतृत्त्व आहे, ना देशाला दिशा देण्याची नैतिक ताकद. केवळ ऐतिहासिक फोटो शेअर करणं आणि इंदिरा गांधींच्या विधानांची उजळणी करणं ही जर काँग्रेसची रणनीती असेल, तर ती अत्यंत पोकळ आणि विस्कळीत असल्याचं निदर्शक आहे.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं, इंदिरा गांधी होणं सोपं नसतं. त्यांनी सैनिकांसोबत इंदिरा गांधी यांचाही फोटो शेअर केला आहे. काँग्रेस नेते श्रीनेत यांनी आणखी एका पोस्टमध्ये म्हटलंय, अमेरिकेच्या डोळ्यात डोळा घालून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. जगाचा भुगोल बदलला होता. अशा होत्या इंदिरा गांधी. तर काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी एक्सवर म्हटलंय की जोपर्यंत तोडलं नाही, तोपर्यंत सोडलं नाही.
इंदिरा गांधी होना आसान नहीं pic.twitter.com/lerjJq8w5U
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) May 10, 2025
जब तक तोड़ा नहीं, तब तक छोड़ा नहीं.
इंदिरा गांधी अमर रहें! #आयरन_लेडी pic.twitter.com/8j9GP8k1MY
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 10, 2025
आता आज जी कांग्रेस इंदिरा गांधीचे दाखले देत आहे त्या कांग्रेसला नेहरूंचा अणुबॉम्बला विरोध, आणीबाणी, राजीव गांधींच्या कार्यकाळात झालेला बोर्फसारखा मोठा घोटाळा, कांग्रेसवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप याचा कदाचित विसर पडला असावा त्यामुळे यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे.
नेहरूंचा अणुबॉम्ब विरोध आणि 1962 चा कलंक
पंडित नेहरूंच्या शांततावादी भूमिकेमुळे भारताने अण्वस्त्र क्षेत्रात सुरुवातीला पाय रोवले नाहीत. परिणामतः 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केल्यावर आपण संरक्षकदृष्ट्या पूर्णपणे कमकुवत असल्याचं जगजाहीर झालं. हे केवळ युद्धातलं अपयश नव्हतं, तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचीही एक दारुण हार होती. काँग्रेसच्या धोरणात्मक गोंधळाचे ते पहिले पडसाद होते.
आणीबाणी: जेथे लोकशाहीचा श्वास थांबला
इंदिरा गांधींच्या शौर्याच्या गोष्टी सांगणारे काँग्रेस नेते 1975 मध्ये त्यांच्या सरकारने लादलेल्या आणीबाणीचा उल्लेख मात्र मुद्दाम विसरतात. विरोधकांना जेलमध्ये डाकणं, प्रसारमाध्यमांवर गळचेपी, आणि संविधानात “धर्मनिरपेक्षता”सारखे शब्द बळजबरीने घालणं हे सर्व त्यांच्या सत्तेच्या दडपशाहीचे पुरावे आहेत. याच पक्षाने एकेकाळी लोकशाहीचा गळा घोटला, याची आठवण कोणीच करून देत नाही.
राजीव गांधी आणि भ्रष्टाचाराचे पायांवर पडलेले सावट
1980 च्या दशकात राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने बोफोर्ससारखा मोठा घोटाळा पाहिला. 64 कोटींच्या लाचखोरीचा आरोप, संरक्षण व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव हे काँग्रेसच्या अधोगतीच्या काळातले महत्त्वाचे वळण ठरले. याच काळात भोपाळ गॅस दुर्घटना घडली, आणि सरकारने जबाबदारी झटकत आरोपींना पळून जाण्याची मुभा दिली. एकीकडे शोकाकुल जनता आणि दुसरीकडे निष्क्रीय सत्ता हेच चित्र उभं राहिलं.
आजच्या गांधी घराण्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्याशी संबंधित नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामुळे काँग्रेसच्या शुद्धतेच्या दाव्यांना तडा गेला. सरकारी संस्था ED च्या चौकशी, कंपनीच्या मालमत्तेचा गैरवापर, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप हे सर्व प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरतं आहे. त्यातच रॉबर्ट वड्रा यांचे जमीन घोटाळे, परदेशी मालमत्ता आणि शेल कंपन्यांद्वारे आर्थिक व्यवहार यामुळे काँग्रेसवर भ्रष्टाचाराची छाया अधिक गडद झाली आहे.
आता 1971 मधील युद्ध जिंकण्यामागची परिस्थिती आणि 2025 मधील युद्ध थांबवण्यामागची वास्तविकता जाणून घेऊयात. म्हणजे तेंव्हाच्या परिस्थितीचा आणि आताच्या परिस्थितीचा अंदाज येईल.
1971: युद्ध जिंकण्यामागे ‘परिस्थिती’ आणि ‘धोरण’ दोन्ही कारणीभूत
इंदिरा गांधींनी 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली, तेव्हा अनेक अनुकूल घटक होते. पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज नव्हता. तेंव्हा भारताला सोव्हिएत युनियनचा स्पष्ट आणि ठाम पाठिंबा होता. तसेच पूर्व पाकिस्तानात (आजचा बांगलादेश) लोकांचा भारताला पाठिंबा होता.शिवाय अमेरिकेच्या धमक्या असूनही भारताचं आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्यात इंदिरा गांधी यशस्वी झाल्या.
2025: युद्ध थांबवण्यामागे ‘वास्तविकता’ आणि ‘दृष्टीकोन’
आजची परिस्थिती पुर्णतः वेगळी आहे. पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत, शिवाय त्यांचं धोरण अस्थिर आहे. तर भारताला युद्धाऐवजी आर्थिक, तंत्रज्ञान आणि जागतिक मंचांवर सामरिक बळ वाढवायचं आहे. आणखी एक बाब म्हणजे चीनसारखा दुसरा शत्रू आधीच सीमेवर सक्रिय आहे. शिवाय अमेरिका, युरोप आणि इस्रायलसारख्या मित्रदेशांनी भारत पाकिस्तानला संयम राखण्याचे आवाहन केले आहे. म्हणजेच, मोदी सरकारने युद्ध थांबवून रक्तपात टाळला, भूभाग राखला आणि आंतरराष्ट्रीय नोंद वाढवली. हा निर्णय इंदिरा गांधींच्या युद्धाइतकाच कठीण होता फक्त दिशा वेगळी होती. त्यामुळे काॅंग्रेस नेत्यांनी हा फरक लक्षात घ्यायला हवा.
भूपेश बघेल, सुप्रिया श्रीनेत, किंवा इतर काँग्रेस नेते हे सगळे आज इंदिरा गांधींचा उल्लेख करत मोदी सरकारवर निशाणा साधतात. मात्र आजच्या काँग्रेसकडे इंदिरा गांधींसारखं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आहे का? त्यांच्या टीकांमध्ये स्पष्टता आहे का? की फक्त विरोधासाठी विरोध हा एकमेव अजेंडा आहे? सध्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमध्ये एक अस्पष्टता आहे कधी शांततेची भाषा, कधी आक्रमकतेचा दिखावा, पण कुठेही ठोस विचारधारा नाही. 2024 च्या निवडणुकीनंतरही काँग्रेसने स्वतःच्या अपयशाचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी केवळ जुन्या गौरवाचे गीत गाणं सुरू ठेवलं.
1971 मध्ये इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले हे सत्य आहे. पण 2025 मध्ये काँग्रेसचा आत्मा हरवल्याचेही तेवढेच खरं चित्र आहे. केवळ इंदिरा गांधींच्या फोटो लावून आणि जुने किस्से सांगून जनता परत मिळणार नाही. काँग्रेसला नव्या नेतृत्वाची, नव्या विचारांची, आणि स्वच्छ, ठोस राजकारणाची गरज आहे जी सध्या कुठेही दिसत नाही.