जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने देश हादरला. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने अत्यंत प्रभावी कारवाई करत आतंकवाद्यांना चोख उत्तर दिलं. यानंतर अमेरिका, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या अनेक राष्ट्रांनी भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रसंघानंही या हल्ल्याचा निषेध करत भारताच्या सुरक्षा उपाययोजनांची दखल घेतली. मात्र या कारवाईला संपूर्ण जगातून पाठिंबा मिळत असतानाच, तुर्की आणि अझरबैजान या देशांनी मात्र पाकिस्तानच्या बाजूने उभं राहत, भारताच्या विरोधात भूमिका घेतली. यामुळे भारतातील व्यापारी, नागरिक आणि पर्यटन क्षेत्रातील लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे आता याचे परिणाम तुर्कीच्या व्यापारावर पर्यटनावर आणि एकुणच तुर्कीच्या अर्थव्यवस्थेत पडताना दिसत आहे.
तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जेव्हा भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळवताना दिसत होता, तेव्हा तुर्कीने मात्र उघडपणे पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली. याच तुर्कीमध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये भयंकर भूकंप झाला होता. तेंव्हा भारतानं तातडीनं “ऑपरेशन दोस्त” या मोहिमे अंतर्गत तुर्कीला मदत पाठवली होती. यामध्ये 250 पेक्षा जास्त बचाव कर्मचारी, श्वानपथकं, डॉक्टर, औषधं, फील्ड हॉस्पिटल इत्यादींचा समावेश होता. पण तुर्कीने हे सगळे उपकार विसरुन पाकिस्तानला पाठिंबा दिला.यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे तुर्कीने बनवलेल्या ‘सोंगर ड्रोन’चा वापर पाकिस्तानने भारताच्या लष्करावर आणि सामान्य नागरिकांवर हल्ला करण्यासाठी केल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत तुर्कीवर विश्वास ठेवणं भारतासाठी कठीण झालं आहे. तुर्कीच्या लोकसंख्येविषयी बोलायचं झालं तर तुर्की हा 8.53 कोटी लोकसंख्येचा देश आहे. या देशात धार्मिक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 99 टक्के मुस्लीम धर्मीय लोक राहतात.
भारतीय व्यापाऱ्यांचा तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार
भारताचा रोष केवळ सरकारपुरता मर्यादित न राहता, तो व्यापार आणि जनमानसाच्या पातळीवर उतरलेला दिसतो. त्याच पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवत तुर्की सफरचंदावर बहिष्कार घातला आहे. पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांनी ठामपणे जाहीर केलं की, “तुर्की पाकिस्तानला समर्थन करत असल्याने, आम्ही तुर्कीकडून सफरचंद खरेदी करणार नाही. त्याऐवजी हिमाचल प्रदेशासारख्या भारतीय भागातूनच सफरचंद खरेदी करू.” ही प्रतिक्रिया केवळ पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील व्यापार मंडळांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आता तुर्कीतून येणारे सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत. परिणामी इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 20 ते 30 रुपये दराने वाढ झाली आहे.
तिकडं राजस्थानच्या संगमरवरी व्यापाऱ्यांनीही तुर्कीकडून संगमरवराची आयात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटलं आहे की भारत हा तुर्की संगमरवरासाठी सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असून आम्ही तुर्कीसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांनी असेही नमूद केले की भारत सुमारे १४ ते १६ लाख टन संगमरवरी आयात करतो, ज्यापैकी ७० टक्के तुर्कीमधून येतो, त्यामुळे हा निर्णय तुर्कीसाठी एक मोठा आर्थिक धक्का ठरला आहे.
🚨 Udaipur marble traders END business with Turkiye for siding with Pakistan amid the ongoing tensions between India & Pakistan.
Kapil Surana, President of Udaipur Marble Processors Committee, says, “If all associations stop trade, it’ll show Indians stand with our government.” pic.twitter.com/UWwEizNnrX
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 14, 2025
सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक
सोशल मिडीयावर #BoycottTurkey आणि #StandWithIndia सारखे हॅशटॅग्स ट्रेंड करत आहेत. अनेक नामवंत व्यक्ती, व्यापारी, आणि सामान्य नागरिक या बहिष्काराला समर्थन देत आहेत. तुर्की आणि अझरबैजानवर रोष व्यक्त करत अनेकांनी या देशांशी कोणतेही व्यावसायिक किंवा पर्यटन संबंधित व्यवहार करु नये असं म्हटलं आहे. कारण दहशतवादी पाकिस्तानचे मित्र असलेले तुर्की आणि अझरबैजान कधीही भारताचे मित्र होऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्व देशभक्त भारतीयांनी एकत्रितपणे अझरबैजान आणि तुर्कीवर उघडपणे बहिष्कार टाकावा. असे आवाहन करण्यात येत आहे.
Turkey and Azerbaijan, friends of terrorist Pakistan, can never be friends of India. All patriotic Indians should openly boycott Azerbaijan and Turkey together. Jai Hind 🇮🇳@Oprationsindoor #iloveindia pic.twitter.com/GCNHfh0fiY
— भूमिपुत्र 🌾हंसराज धाकड़ 🇮🇳 (@hansaraja61908) May 14, 2025
पर्यटनावर परिणाम – तुर्की ऐवजी ग्रीसला पसंती
तुर्कीमधील ऐतिहासिक शहरं आणि स्वस्त दरामुळे भारतीय पर्यटकांसाठी ते एक लोकप्रिय ठिकाण बनलं होतं. म्हणजेच भारत हा तुर्कीमध्ये सर्वात मोठा पर्यटक पाठवणारा देश आहे. ह्यावर्षी त्या देशाला भेट देणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी १०% हे भारतीय असतील असा त्यांच्या पर्यटन विभागाचा अंदाज होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. अनेक भारतीय पर्यटकांनी आपली तुर्की टूर रद्द करत ग्रीस, जॉर्जिया आणि युरोपातील इतर देशांना पसंती दिली आहे. काही टूर कंपन्यांनी तुर्की टूर पॅकेजेस थांबवले असून, याबाबत अधिकृत निवेदनं दिली आहेत.
गोवा मधील संताप, तुर्की पर्यटकांवर निर्बंध?
गोवा हे तुर्की पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ मानलं जातं. मात्र ‘गोवा व्हिलाज’ या नामांकित हॉटेलनं तुर्की पर्यटकांना सुविधा न देण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल व्यवस्थापकांनी सांगितलं की, “आम्ही भारताच्या सुरक्षेला प्राधान्य देतो. ज्या देशांनी भारतविरोधी भूमिका घेतली आहे, त्यांच्याशी आम्ही व्यवहार करणार नाही.” सोशल मिडियावरही तुर्की पर्यटकांनी लवकरात लवकर भारत सोडावं अशी मागणी केली जात आहे.
मोदी सरकारची भूमिका काय?
भारत सरकारने या प्रकरणी अजून अधिकृत आर्थिक निर्बंध जाहीर केलेले नाहीत, पण व्यापार आणि पर्यटन क्षेत्रातील स्वयंस्फूर्त निर्णय हे स्पष्ट दर्शवत आहेत की भारतीय जनतेने तुर्की आणि अझरबैजानच्या भूमिकेला क्षमा न करण्याचा निर्धार केला आहे. ही स्थिती दीर्घकालीन असण्याची शक्यता आहे, या देशांना पुन्हा विश्वास संपादन करायचा असेल तर त्यांना आपल्या भूमिकेत बदल करावा लागणार आहे.
तुर्की- पाकिस्तान संबंधावर राजकीय विश्लेषण
यूएई आणि इजिप्तमधील भारताचे माजी राजदूत नवदीप सूरी यांच्या मते, तुर्की आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीक केवळ वैचारिक नाही, तर तुर्कीला पाकिस्तानच्या संरक्षण बाजारपेठेचा मोठा वाटा मिळतो. तुर्कीने पाकिस्तानला बायरक्तार टीबी2 सोंगार ड्रोन आणि मिल्गेम-श्रेणीच्या युद्धनौका पुरवल्या आहेत. २०२० पर्यंत तुर्की पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार बनला होता. तुर्की इस्लामिक जगतात नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा बाळगतो, आता सुरी यांच्या मतांवरुन असं दिसतं की भारत-तुर्की संबंध काही काळ तणावपूर्ण राहण्याची शक्यता आहे.
एकुणच ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताने दहशतवादाच्या विरोधात एक ठाम आणि निर्णायक भूमिका घेतली. या लढाईत भारताच्या पाठीशी संपूर्ण जग उभं राहत असताना, फक्त तुर्कीच नाही तर अझरबैजानचीही भूमिका त्यांच्यासाठी महागात पडू शकते. आज संपूर्ण भारत तुर्कीच्या विरोधात उभा आहे, त्यांच्या मालावर बहिष्कार घालत आहे. याला सर्वस्वी जबाबदार तुर्कीची भारत विरोधी भुमिका आहे.पण भारत आता केवळ लष्करी आणि राजनैतिक नव्हे, तर आर्थिक आणि सामाजिक पातळीवरही या देशांना कठोर उत्तर देत आहे.