बेंगळुरू/बेळगाव – सध्या सोशल मीडियावर एक खोटी पोस्ट व्हायरल झाली होती ज्यात असा दावा करण्यात आला होता की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) समर्थकांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बेळगावीतील घरी हल्ला केला. मात्र, कर्नाटक पोलिसांनी ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.
एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडियावर “अनीस उद्दीन” नावाच्या एका प्रोफाइलवरून हा दावा करण्यात आला होता. या पोस्टमध्ये एक फोटोही होता, ज्यात खोलीतील तोडफोड दाखवण्यात आली होती.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कर्नल कुरेशी यांच्या सासरच्या घराची तपासणी केली आणि सर्व काही सुरळीत असल्याचे स्पष्ट केले. बेळगावीचे पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद यांनी ही पोस्ट खोटी असल्याचे जाहीर केले आणि संबंधित खात्याला हटवण्याचा इशारा दिल्यानंतर ती पोस्ट हटवण्यात आली. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, पोलिसांनी कुरेशी यांच्या घराच्या आजूबाजूला बंदोबस्त वाढवला आहे.
या खोट्या पोस्टमागे पाकिस्तानशी संबंधित सायबर हॅकर्सचा हात असल्याचा संशय आहे. भारतात सध्या पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले होत असून, अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.
कर्नल कुरेशी – एक प्रेरणास्त्रोत
कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्करातील पहिल्या महिला अधिकारींपैकी एक आहेत, ज्यांनी अलीकडेच सरकारच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या देशातील तरुणींसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत. गुजरातमधील वडोदरा येथे जन्मलेल्या सोफिया कुरेशी यांचे लग्न कर्नाटकातील कर्नल ताजुद्दीन बागेवाडी यांच्याशी झाले आहे, आणि त्यांचे सासर बेळगावी येथे आहे.
सतर्क राहणे गरजेचे
ही घटना केवळ एका अफवेशी संबंधित नाही तर ही डिजिटल माध्यमातून चालणाऱ्या युद्धाची झलक आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात धार्मिक, जातीय किंवा प्रांतीय तेढ निर्माण करणे हे दुश्मनांचे प्रमुख शस्त्र आहे. अशा वेळी मीडिया साक्षरता, पोलिस यंत्रणांवर विश्वास आणि सामजिक जबाबदारी हीच आपली खरी ढाल ठरते.
🚨 RSS hate strikes again! Col Sophia Qureshi, Muslim Indian Army officer & spokesperson, targeted. Her Belagavi home attacked at 3 AM, son Sameer brutally beaten, house torched. Family now under Army protection in Delhi. #RSSViolence #HindutvaHate #JusticeForSophia pic.twitter.com/gdLaVhOf8J
— J.N (@JN_Araain) May 13, 2025