Chatrapati Sambhaji Maharaj: आज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. एक पराक्रमी योद्धा, राजकारणी, साहित्यिक व रसिक असे मिश्रण इतिहासात एकाच राज्यामध्ये पाहिला मिळाले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज हे शूरवीर, पराक्रमी आणि अत्यंत बुद्धिमान होते. त्यांच्या याच गुणामुळे ते इतिहासात अजरामर झाले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकूयात.
छत्रपती संभाजी महराजांचे बालपण:
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवरायांचे पुत्र असल्यामुळे म्हणजेच राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
साहित्यप्रेमी छत्रपती संभाजी महाराज:
छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. तसेच नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ देखील त्यांनी लिहिले.
शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक:
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ रोजी रायगड किल्ल्यावर झाला होता. या दिवशी संभाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून राज्य स्विकारले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ९ महिन्यांनी त्यांचा राज्याभिषेक करण्यात झाला होता.
-राज्याभिषेकानंतर त्यांनी जनतेला विश्वास दिला की, शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था तशीच राहील आणि त्यांनी रयतेची मने देखील जिंकली.
-राज्याभिषेकानंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आपेल जीवन समर्पित केले.
-संभाजी महाराजांनी प्रजेच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण कामे केली आहेत. संभाजी महाराजांनी सार्वजनिक मार्ग आणि जल व्यवस्थापनाचा जीर्णोद्धार केला. तसेच शेतकऱ्यांवरील कर कमी केला. विशेष म्हणजे त्यांनी लोकांना मोफत उपचार आणि औषधे उपलब्ध करून दिली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला:
-छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या लष्करी पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला.
-त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पन्हाळा आणि रायगड किल्ले जिंकले तसेच इतरही महत्वपूर्ण प्रदेशांवर त्यांनी नियंत्रण मिळवले.
-औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला.औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते. तसेच औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. विशेष म्हणजे त्यावेळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला.
– संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला होता की नंतर त्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत केली नव्हती. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
-अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी लढा दिला.
छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू:
1689 मध्ये मुघलांनी फितूरी करत संभाजी महाराज कैद केले. कैद केल्यानंतर औरंगजेबाने सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जीवन जगण्याचा पर्याय छत्रपती संभाजी महाराजांसमोर मांडला. तसेच छत्रपतींनी धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्विकारल्यास त्यांना जीवनदान देण्यात येईल, असा प्रस्ताव देखील छत्रपतींसमोर मांडला. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांची अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढली. तसेच अत्यंत क्रूरपणे हालहाल करून छत्रपतींना ठार मारण्याचे आदेश दिले. ११ मार्च १६८९ मध्ये संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. समोर मृत्यू येऊन उभा होता तरी संभाजी महाराज मुघलांसमोर झुकले नाहीत आणि आपला धर्म सोडला नाही.
एकंदरित संभाजी राजांनी धोरणात्मक बुद्धिमत्ता, नेतृत्व कौशल्याने प्रजेच्या मनावर राज्य केले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावले आणि मराठा साम्राज्याची पताका उंचावली, म्हणूनच इतिहासातील ते एक आदर्श राजा आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरले. अशा या महान राजाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन.