कॅनडाच्या राजकारणात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या नियुक्तीसोबतच त्या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रिपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या हिंदू महिला ठरल्या आहेत. त्यांनी शपथविधीच्या वेळी हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्याने हा क्षण संपूर्ण जगाच्या नजरा वेधणारा ठरला.ही शपथ केवळ राजकीय पदग्रहण नव्हती. तर तो जागतिक स्तरावर संस्कृती, मूल्य, आणि परंपरेचा अभिमानाने केलेला स्वीकार होता.
एक वैश्विक घटना ठरलेला शपथविधी
कॅनडाच्या संसद भवनात झालेल्या शपथविधी कार्यक्रमात, अनिता आनंद यांनी जेव्हा भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली, तेव्हा उपस्थितांच्या नजरा त्या पवित्र ग्रंथाकडे वळल्या. विविध धर्म आणि संस्कृतींचा सन्मान करणाऱ्या कॅनडात ही कृती एक संदेश देऊन गेली की जागतिक राजकारणातही आपल्या मूळ परंपरांचा अभिमानाने स्वीकार करता येतो. यावेळी त्या म्हणाल्या की, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून निवड झाल्याने सन्मानित वाटत आहे. एक चांगले आणि सुरक्षित जग निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मार्क कार्नी आणि आमच्या टीमसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे.
https://twitter.com/MoneycontrolH/status/1922557797700440275
महिला सक्षमीकरणाचा आदर्श नमुना
पंतप्रधान कार्नी यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळात विविधता, समतोल आणि क्षमतेचा आदर्श ठेवत ५०% महिला मंत्र्यांची निवड केली. ही परंपरा माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सुरू केली होती, पण कार्नी यांनी त्याला एक नवी दिशा दिली आहे. माजी परराष्ट्र मंत्री मेलोनी जोली यांना उद्योग मंत्रालय देण्यात आले असून, अनिता आनंद यांच्यावर जागतिक घडामोडी, व्यापार धोरण, संरक्षण भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य यांचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. अनिता आनंद या यापूर्वी माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सरकारमध्ये देखील कॅबिनेट मंत्री होत्या. अनिता आनंद यांचं मंत्रिपद केवळ स्त्री म्हणून नव्हे, तर गुणवत्तेच्या बळावर मिळालं आहे. त्यांनी सार्वजनिक सेवा, खरेदी आणि संरक्षण विभाग यांमध्ये यशस्वी नेतृत्व करत महत्त्वाचे निर्णय घेतले. विशेषतः संरक्षण मंत्री असताना त्यांनी भारत–कॅनडा संबंध मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांची विचारशीलता, अभ्यासपूर्ण निर्णयप्रक्रिया आणि संयमी नेतृत्वशैली पाहता त्यांना ही नव्याने मिळालेली जबाबदारी त्या उत्तमरित्या पार पाडतील अशी आशा आहे.
भारताशी असलेले नाते.
अनिता आनंद यांचा जन्म १९६७ मध्ये कॅनडाच्या नोव्हा स्कॉटिया प्रांतात झाला. त्यांचे वडील एस. व्ही. आनंद हे मूळ तामिळनाडूचे, तर आई सरोज या पंजाबच्या आहेत. दोघेही डॉक्टर आहेत. भारतात दोन भिन्न भागांतील सांस्कृतिक वारसा घेऊन कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या त्यांच्या कुटुंबाने अनितामध्ये एक जागतिक दृष्टिकोन रुजवला. शालेय आणि उच्च शिक्षणातही अनिता यांची प्रगती उल्लेखनीय होती. त्यांनी कायद्यात डॉक्टरेट केली आणि टोरंटो विद्यापीठात अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून कार्य केलं. राजकारणात त्यांचा प्रवेश २०१९ साली ओकव्हिल मतदारसंघातून खासदार म्हणून झाला. तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला गती मिळाली.
अमेरिका-कॅनडा संबंधांत अनितांची भूमिका
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिका आणि कॅनडामध्ये आर्थिक धोरणांवरून तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, कॅनडासाठी परराष्ट्र धोरण अधिक संवेदनशील विषय ठरला आहे. त्यामुळे अनिता आनंद या नव्या सहकार्याच्या धोरणावर काम करतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्यासोबत फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन (अर्थमंत्री) आणि डोमिनिक लेब्लँक (व्यापार मंत्री) हे देखील अमेरिकेशी व्यापार, सुरक्षा, हवामान बदल आणि मानवाधिकार यांसारख्या मुद्द्यांवर सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
भारतीय समुदायासाठी अभिमानाचा क्षण
अनिता आनंद यांची परराष्ट्र मंत्रीपदावर झालेली निवड संपूर्ण भारतीय वंशीय समुदायासाठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विविध देशांतील भारतीय वंशीय लोकांना प्रेरणा मिळते आहे की, जागतिक स्तरावरही आपण आपल्या मूल्यांवर ठाम राहून नेतृत्व करू शकतो. शपथविधीत भगवद्गीतेचा समावेश हा केवळ एक व्यक्तिगत श्रद्धेचा भाग नसून, हा हिंदू संस्कृतीच्या सार्वकालिक तत्वांचा एक प्रकारचा जागतिक सन्मानही होता.
एकुणच अनिता आनंद यांची परराष्ट्र मंत्रीपदावर झालेली निवड ही केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाची गोष्ट नाही, तर ती संपूर्ण हिंदू समुदायासाठी प्रेरणादायी घटना आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कॅनडाचं परराष्ट्र धोरण अधिक मजबूत, समतोल आणि सहकार्यपूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. विविधता, समता आणि गुणवत्ता यांना मान्यता देणाऱ्या कॅनडाच्या लोकशाही प्रणालीत अनिता आनंद यांचा सहभाग एक आदर्श उदाहरण ठरेल.