सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. आज झालेल्या निवडणुकीत ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष ओम बिर्ला यांनी १९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारने लावलेली आणीबाणी यावर मत व्यक्त केले. तसेच या आणीबाणीचा निषेध केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. यात ते म्हणाले, ”मला आनंद झाला की माननीय सभापतींनी आणीबाणीचा तीव्र निषेध केला, त्या काळात झालेल्या अतिरेकांवर प्रकाश टाकला आणि लोकशाहीचा कसा गळा घोटला गेला हे देखील त्यांनी नमूद केले. आणीबाणी ५० वर्षांपूर्वी लागू करण्यात आली होती. पण आजच्या तरुणांना त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे, कारण संविधान पायदळी तुडवलं जातं, जनमत गुदमरले जाते आणि संस्था उद्ध्वस्त होतात तेव्हा काय घडते याचे ते एक समर्पक उदाहरण आहे. आणीबाणीच्या काळात घडलेल्या घडामोडींनी हुकूमशाही काय असते याचे उदाहरण दिले, असे दिसते.”
दरम्यान, आणीबाणीच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त एनडीएच्या नेत्यांनी बुधवारी संसदेच्या आवारात निदर्शने करून काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले की, आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील काळा डाग आहे. भाजप खासदार कंगना रणौत म्हणाल्या की, संविधान धोक्यात असल्याचा दावा करण्यापूर्वी काँग्रेसने आपला ट्रॅक रेकॉर्ड पाहण्याची गरज आहे.