नुकत्याच झालेल्या अनंत भाई अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याची चर्चा देशभर झाली आहे. जामनगर मधील अद्भुत विवाह सोहळा, त्यानंतर परदेशात क्रूज मध्ये झालेला पूर्व विवाह सोहळा, यांनी देशाचे नाही तर जगाचे लक्ष वेधले होते.
अंबानी कुटुंब केवळ श्रीमंत म्हणून नाही तर त्यांच्या दानधर्मासाठी तसेच समाज उपयोगी कामासाठी सुद्धा चर्चित असतात.त्यामुळेच आता चर्चा आहे ती अंबानी कुटुंबियांनी घडवून आणलेल्या एका आगळ्यावेगळ्या सामूहिक विवाह सोहळ्याची, जो रिलायन्स कॉर्पोरेट पार्क ठाणे येथे पार पडला आहे.
आर्थिक सुबत्त नसलेल्या दांपत्याची जबाबदारी घेऊन, त्यांचा थाटामाटात लग्न समारंभ अंबानी कुटुंबियांकडून करण्यात आला. अतिशय आलिशान मंडप भोजन व्यवस्था हे बघून नवविवाहित दांपत्य आणि त्यांचे कुटुंबीय भारावून गेले.
या सामूहिक लग्न समारंभामुळे अनंत भाई अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची सुरुवात झाली आहे.
या सामूहिक विवाह सोहळासाठी 50 आर्थिक दुर्बल दांपत्यांना पालघर वरून या विशेष सोहळ्यासाठी स्थानांतरित करून, शंभर किलोमीटर दूर ठाणे येथे अविस्मरणीय सोहळा पार पडला. साधारणतः 800 लोकांमध्ये हा सोहळा पार पडला या सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय, समाजातील प्रतिष्ठित लोक, समाजसेवक इत्यादी उपस्थित होते.व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये नीता अंबानी पती मुकेश यांच्यासोबत बसून मंत्रोच्चार करतानाही दिसून आल्या.
या सामूहिक विवाह सोहळ्यात मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते
सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना अंबानी कुटुंबियांनी महागड्या भेटवस्तू दिल्याची माहिती मिळत आहे. ज्यामध्ये मंगळसूत्र, अंगठी आणि नथ यांचा समावेश आहे.तसेच जोडवी, पैंजण यांसारखे चांदीचे दागिनेही भेट म्हणून दिल्याची माहिती मिळत आहे. प्रत्येक वधूला स्त्रीधन म्हणून एक लाख रुपयांचा धनादेशही दिल्याची माहिती समोर आली आहे.तसेच विवाहित जोडप्यांना वर्षभरासाठी पुरेसा किराणा सामान आणि घरगुती वस्तू भेट दिल्या गेल्या ज्यामध्ये विविध प्रकारच्या 36 जीवनावश्यक वस्तू आणि भांडी, गॅस स्टोव्ह, मिक्सर, पंखे तसेच गाद्या आणि उशा यांचा समावेश आहे.
अंबानी कुटुंबियांचं या सामूहिक विवाह सोहळ्याच्या नियोजनानंतर सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे .