लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये अनेक नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच करदात्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र आज संसदेत अर्थसंकल्पावर चालू असलेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा म्हणजे सत्ताधारी एनडीए सरकारवर जोरदार टीका केली आहे. काय म्हणाले आहेत राहुल गांधी, जाणून घेऊयात.
संसदेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, ”आज देशात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शेतकरी, तरुण आणि सगळेच घाबरले आहेत. भाजपमधील लोक घाबरले आहेत. सगळे मंत्री घाबरले आहेत. एवढेच नाही तर भारत भाजपच्या चक्रव्यूहात अडकला असल्याचे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी इथेच थांबले नाहीत. 21व्या शतकात नवा चक्रव्यूह आला आहे, तोही कमळाच्या आकारात. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चक्रव्यूहाचे प्रतीक छातीवर धारण करतात. राहुल गांधी म्हणाले, महाभारतातील चक्रव्यूह, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वधामा आणि शकुनी हे 6 लोक नियंत्रित करत होते आणि आजही 6 लोक नियंत्रित करत आहेत, ज्यात नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी, मोहन भागवत जी, अजित डोवाल जी यांचा समावेश आहे.”
अंबानी-अदानी यांचे नाव घेत राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या व्यवसायावर या दोघांचे नियंत्रण आहे. जेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राहुल यांना नाव घेण्यापासून रोखले तेव्हा राहुल गांधी म्हणाले, मी त्यांना ए1, ए2 म्हणू शकतो का? राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.
राहुल गांधी म्हणाले , कोरोनाच्या काळात जेव्हा पंतप्रधानांनी मध्यमवर्गीयांना प्लेट्स वाजवायला आणि मोबाईलचे दिवे लावायला सांगितले तेव्हा त्यांनी हे सर्व केले. मात्र या अर्थसंकल्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर वाढवून मध्यमवर्गीयांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. राहुल म्हणाले की, देशात टॅक्स टेररिझम आहे, ते थांबवण्यासाठी बजेटमध्ये काहीही केले नाही. ते म्हणाले की, देशाचा अर्थसंकल्प बनवण्याचे काम 20 अधिकाऱ्यांनी केले आहे. या 20 अधिकाऱ्यांपैकी केवळ एक अल्पसंख्याक आणि एक ओबीसी आहे.